पुणे । Pune
राज्यभरात आज गोपाळकाल्याचा अन् दहीहंडीचा मोठा जल्लोष पाहावयास मिळत असतानाच, पुण्यातून एक अत्यंत वेदनादायी आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना समोर आली आहे. जुन्या सांगवी भागात दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर लोखंडी सांगाडा (कमान) उतरवताना घडलेल्या भीषण अपघातात सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्सवाचा आनंद सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवीतील लेन नंबर २ मध्ये ‘विघ्नहर्ता दहीहंडी मंडळा’च्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास हंडी फुटल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते स्टेज आणि कमानीचा लोखंडी सांगाडा खाली उतरवण्याचे काम करत होते. मृत सलमा पठाण आणि त्यांचे पती सलाउद्दीन हे दोघे दहीहंडी पाहण्यासाठी आले होते. हंडी फुटल्यानंतर दोघेही घराकडे परतत असताना, अचानक लोखंडी कमानीचा एक अवजड रॉड सलमा यांच्या थेट डोक्यात कोसळला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारापूर्वीच त्यांचा प्राण गेला.
या घटनेतील सर्वात शोकांतिका म्हणजे, मृत सलमा पठाण यांचा मुलगा रहीम पठाण हा स्वतः याच दहीहंडी मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. आपल्याच मुलाच्या मंडळाकडून ही दुर्घटना घडल्याने आणि सर्व मुले ओळखीची असल्याने पठाण कुटुंबीयांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. “सर्व मुले आमचीच आहेत, त्यामुळे आम्हाला तक्रार करायची नाही,” अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.
सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आणि औंध रुग्णालयात धाव घेतली. सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (AD) नोंद करण्यात आली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी साऊंड सिस्टीम पडल्याची चर्चा चुकीची असून कमानीचा लोखंडी रॉडच खाली पडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, आज राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानतर्फे तब्बल ७१ लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत, तर टेंभी नाक्याच्या मानाच्या दहीहंडीतही लाखांची पारितोषिके दिली जात आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे मनसेच्या दहीहंडीत ‘अखिल मालपा डोंगरी’ या पथकाने यंदाचे पहिले ९ थर लावून विक्रम रचला. मात्र, ९ वा थर लावून खाली उतरताना एक गोविंदा थेट वरून खाली कोसळला. सुदैवाने आयोजकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. एकीकडे थरांचा थरार सुरू असताना पुण्यात घडलेल्या अपघातामुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




