Sunday, April 12, 2026
HomeनगरCrime News : मी महादेवाचा अवतार, तू माझी पार्वती.. म्हणत महिलेवर अत्याचार;...

Crime News : मी महादेवाचा अवतार, तू माझी पार्वती.. म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे । प्रतिनिधी

नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच, पुण्यातून एका भोंदू महाराजाच्या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या ऋषिकेश वैद्य नावाच्या व्यक्तीने एका ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची पुण्यातील रहिवासी आहे. तिची आणि आरोपी ऋषिकेश वैद्यची ओळख वसई येथील एका फाउंडेशनच्या माध्यमातून झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे सोशल मीडियावरील संवादात झाले. ऋषिकेशने अध्यात्माच्या नावाखाली आणि स्वतःला एक मोठा आध्यात्मिक गुरू भासवून पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. आरोपीने आपण ‘भगवान महादेवाचा अवतार’ असल्याचा खोटा दावा केला आणि पीडित महिला ही आपली ‘पार्वती’ असल्याचे भासवत तिची दिशाभूल केली.

अध्यात्माचा हा खोटा बुरखा पांघरून आरोपीने २०२३ मध्ये पुण्याच्या मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये महिलेवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला. यावेळी नराधम आरोपीने पीडितेचे काही खासगी छायाचित्रे चोरून काढली. या फोटोंचा वापर करून त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी देत त्याने २०२५ मध्ये वसईतील एका लॉजमध्ये पुन्हा पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा गुन्हा सुरुवातीला वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. मात्र, गुन्ह्याची पहिली घटना पुणे शहरात घडल्याने तांत्रिक कारणास्तव हा तपास आता पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपासाला गती दिली आहे.

पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश वैद्य हा एक स्वयंघोषित ‘महाराज’ असून त्याने आपल्या ओळखीचा आणि पीडितेच्या विश्वासाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरवापर केला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची चार विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सध्या विविध जिल्ह्यांमध्ये आरोपीचा माग काढत असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पीडित महिलेला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य मिळाले. अशाच प्रकारे जर कोणाची फसवणूक किंवा छळ झाला असेल, तर त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास मांजरी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : श्रीरामपूरच्या व्यक्तीकडून नगरच्या ठेकेदाराला सव्वा तीन कोटींचा चूना

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर येथील एका तरूण कंत्राटदाराची तब्बल 3 कोटी 50 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक...