
पुणे (प्रतीनिधी)
कुराश खेळात प्रावीण्य मिळवल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करून क्रीडा कोट्यातील पाच टक्के आरक्षणाचा लाभ घेत सरकारी नोकऱ्या मिळविल्याचा प्रकार पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.
या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४९) आणि अंकुश विठ्ठल नागर (वय ४०) यांना ३ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.
कुराश हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ असून महाराष्ट्रात २०१२ पासून ‘कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ या क्रीडा संघटनेमार्फत खेळला जातो. या खेळातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरीमध्ये खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो.
या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा निनावी अर्ज पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यानंतर केलेल्या चौकशीत २०१६ ते २०१९ या कालावधीतील काही स्पर्धा इंडियन कुराश असोसिएशनशी संलग्न नसलेल्या संघटनेने घेतल्याचे समोर आले. तसेच काही प्रमाणपत्रांवर सह्या करून ती वितरित करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले.
सन २०१६ ते २०२२ या कालावधीतील स्पर्धांचा कथित बनावट अभिलेख तयार करण्यासाठी महाराष्ट्र कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा संघटकांकडून नऊ ते दहा वर्षे पूर्वीच्या तारखांची खेळाडूंची खोटी सहभागपत्रे बनवून घेतल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे स्पर्धेत सहभागी न झालेल्या व्यक्तींची प्रमाणपत्रे खरी असल्याचे पडताळून देण्यात आले. त्यामुळे संबंधितांना खेळाडू आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या गैरप्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पुणे पोलिस करीत आहेत.




