पुणे (प्रतिनिधी)
पुणे विभागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि अवैध धंदेवाईकांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या महिनाभरात मोठी कारवाई करत दणका दिला आहे. २५ मे ते २४ जून या कालावधीत एफडीएने पुणे विभागात तब्बल १९८ ठिकाणी अचानक छापेमारी केली असून, या धडक मोहिमेत ८४ लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, साडेसात कोटींहून अधिक किमतीचे भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि अवैध औषधांचा साठा जप्त केला आहे. या व्यापक कारवाईत एकूण ९२ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर अनेक प्रतिष्ठाने कायमस्वरूपी सील करण्यात आली आहेत.
पुणे विभागात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधात प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली होती. याअंतर्गत ८७ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत ८४ लाख ८९ हजार ८८९ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. केवळ साठाच नाही, तर या गुन्ह्यांमध्ये वापरलेली ८ वाहनेही प्रशासनाने ताब्यात घेतली असून, संबंधित ७७ आस्थापने सील करण्यात आली आहेत. गुटख्याच्या या अवैध व्यवसायावर लगाम घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पवित्रा घेतल्याचे यावरून दिसून येते.
केवळ गुटख्यावरच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारी अन्नभेसळ रोखण्यासाठी एफडीएने मोठी कामगिरी केली आहे. विभागातील १११ आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये आंबे, चहा पावडर, मसाले, खाद्यतेल, तूप, खवा, पनीर, कुल्फी, बेकरी उत्पादने, विविध स्वीट मार्टमधील पदार्थ, रेडी-टू-सर्व्ह पेये, रंगमिश्रित सुपारी आणि पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा समावेश आहे. या तपासणीत तब्बल ७ कोटी ५० लाख ५८ हजार २०४ रुपये किमतीचा आणि सुमारे १० कोटी ३३ लाख किलो वजनाचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
औषध विभागानेही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली असून, एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत १०,४९२ ट्रामाडॉलयुक्त कॅप्सूल जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या औषधांची किंमत ६८,३२८ रुपये असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, बाजारात नामांकित ब्रँड्सच्या नावाने विकली जाणारी बनावट सौंदर्यप्रसाधनेही एफडीएने जप्त केली आहेत, या प्रकरणातही पोलिसांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासातून एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. या विषारी दारूसाठी लागणाऱ्या मेथेनॉलचा पुरवठा भिवंडी येथून होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. एफडीएने तातडीने पावले उचलत ५,९२९ किलो मेथेनॉलचा साठा जप्त केला असून, या पुरवठादाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण पुणे विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोठेही संशयास्पद अन्नपदार्थ, औषधे किंवा अवैध विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी. जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे संकेत देत ही विशेष मोहीम यापुढेही निरंतर सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




