पुणे । Pune
पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरीही आरोपी अद्याप मोकाटच आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. त्याचबरोबर आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे.
तसंच, आरोपीची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार, असे पोलिसांनी जाहीर केलं असून २०० पेक्षा अधिक संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती संकलित केली असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता “सर्च लाईट” बसवण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरनसुद्धा बसवले जाणार असून आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. तसंच, पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे.