Friday, July 24, 2026
Homeमहाराष्ट्रHadapsar IED News : ४०० रुपयांचा 'जुगाड' आणि युट्युब प्रशिक्षण! हडपसर बॉम्ब...

Hadapsar IED News : ४०० रुपयांचा ‘जुगाड’ आणि युट्युब प्रशिक्षण! हडपसर बॉम्ब प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा

पुणे । Pune

पुण्यातील हडपसर परिसरातील एका रुग्णालयात बॉम्ब (IED) ठेवून शहरात घबराट निर्माण करणाऱ्या गुढ प्रकरणाचा छडा लावण्यात महाराष्ट्र एटीएसला (दहशतवाद विरोधी पथक) मोठे यश आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून एटीएसने संशयित आरोपी शिवाजी राठोड याला मोठ्या शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे, हा बॉम्ब नसून केवळ ४०० रुपयांत तयार केलेली एक ‘बॉम्बसदृश’ वस्तू होती, जी आरोपीने युट्युबवरील व्हिडिओ पाहून बनवली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हडपसरमधील त्या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. तांत्रिक तपासावरून तो आझाद हिंद एक्सप्रेसने नागपूरच्या दिशेने जात असल्याचे समजले. एटीएसचे पथक नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर आधीच दबा धरून बसले होते. गाडी येताच चहुबाजूंनी घेरून राठोडला ताब्यात घेण्यात आले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या थरारक कारवाईचा तपशील जाहीर केला.

सुरुवातीला या घटनेमागे काही दहशतवादी कट असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणाला कोणताही दहशतवादी अँगल नाही. आरोपीला पैशांची तीव्र गरज होती. १० मे रोजी तो उपचारासाठी रुग्णालयात गेला होता, पण उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने खंडणी उकळण्याच्या हेतूने हा बनाव रचला होता.”

तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने युट्युबवर बॉम्ब कसा बनवायचा याचे व्हिडिओ पाहिले होते. केवळ ४०० रुपयांच्या साहित्यात त्याने डिजिटल घड्याळ, चार पाईप्स, काळ्या-लाल रंगाच्या वायर्स आणि सेलो टेपच्या मदतीने ही वस्तू तयार केली होती. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीनुसार, यात कोणतेही स्फोटक पदार्थ नव्हते. मात्र, दिसायला तो हुबेहूब आयईडी (IED) सारखा वाटत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

मूळचा सोलापूरचा असलेला शिवाजी राठोड पुण्याच्या मांजरी भागात कपडे आणि शूजचे दुकान चालवतो. त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. नागपूरमार्गे तो हावडा आणि तेथून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याची बहीण नेपाळमध्ये राहत असून तिथे थंडी असल्याने आपण तिकडे जात असल्याचे त्याने घरी सांगितले होते. दरम्यान, आरोपीच्या घरातून पोलिसांनी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य आणि दोन किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

एनटीएचे ४७ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर...