पुणे | Pune
पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडलाय. तीन दलित मुलींचा छळ पोलिसांनी केल्याचा आरोप करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमधील एक महिला आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली. यानंतर त्या महिलेला मदत करणाऱ्या मुलींच्या घरी पोलिस पोहोचले. पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नसता विना परवानगी तीन महिलांचा पाच तास शारीरिक, मानसिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी देखील आंदोलन करावे लागले, मात्र अजुनही गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उपस्थित केला आहे.
वॉरंट नसताना घरात घुसून छळ
एका पीडित तरूणीने सांगितले की, ‘मुळात ही केस छत्रपती संभाजीनगरमधील आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आमच्या घरी आले होते. पोलिसांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच खासगी आयुष्याबाबत नको ते प्रश्न विचारले. तसेच बेदम मारहाण केली’, असा आरोप पीडित महिलेने केला. पोलिसांनी कोणतेही वॉरंट नसतानाही घरात घुसून छळ केला . पोलिस एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी फक्त बेडरुमच नाही तर ते आमच्या बाथरूममध्येही शिरले. पोलिसांनी आमच्या बाथरूममध्ये जाऊन चक्क आमच्या इनरवेअर तपासल्या. आम्हाला घाण घाण शिव्या देत होते. पूर्ण बेडरूम त्यांनी तपासली असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही
आम्ही त्यांना याबद्दल जाब विचारताच पोलिस स्टेशनला चला…आम्ही दाखवतो, असे म्हणत धमक्या दिल्या. पीडित तीन मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, अजूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल करण्यात आला नाहीये. पीडित मुलींना न्याय मिळून देण्यासाठी आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
रोहित पवार, सुजात आंबेडकरांकडून आंदोलन
याप्रकरणी दोषी पोलीस अधिकारी आणि कार्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. मुली ज्या घरात राहातात त्या घरमालकालाही धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रशांत जगताप यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीडित तरुणी आणि कार्यकर्त्यांशी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी चर्चा केली, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
गुन्हा दाखल करु शकत नाही, पोलिसांचे पत्र
मुलींनी ज्याबाबत तक्रार केली आहे, ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळलेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुरुवातीला पोलिसांनी रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्या तक्रारीबाबत काय घडते, ते कळवू, असे मुलींना सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही या मुली, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. अखेर रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी आम्ही गुन्हा दाखल करु शकत नाही, असे सांगत हे पत्र मुलींना दिले. त्यामुळे मुली संतापल्या आणि त्यांनी हे पत्र फाडून टाकले. या सगळ्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव असल्याची चर्चा रंगली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




