घारगाव |वार्ताहर| Ghargav
देशाच्या एका टोकावरुन दुजर्या टोकाला अर्थात ओडिशा (Odisha) ते पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) असा तब्बल दीड हजार किलोमीटरचा प्रवास करुन महाराष्ट्रात वाहन चालकांच्या मदतीने उच्च प्रतीचा गांजा (Cannabis) पुरविला जातो. अशाच 23 किलो गांजाची (Cannabis) दुधाच्या वाहतून ‘कन्साईनमेंट’ घेऊन निघालेला ट्रक आळेखिंड परिसरातील एसएसटी पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडला. त्याच्याकडून 5 लाख 92 हजार 975 रुपयांच्या गांजासह 45 लाख रुपयांचा दुधाचा ट्रक (Milk Truck) असा एकूण 50 लाख 92 हजार 975 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. ओडिशाच्या गांजाची जुन्नरला ‘धुंद’ असल्याचे यावरुन उघड झाले आहे.
देशात ओडिशाच्या गांजाचा (Odisha Cannabis) दर्जा एक नंबरचा असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे सर्वाधिक मागणी असते. तस्करांसाठी महाराष्ट्र (Maharashtra) मोठी बाजारपेठ असून मालवाहतूक वाहन चालकाच्या मदतीने जुन्नर तालुक्यात ओडिशातून गांजाची तस्करी (Cannabis Smuggling) करण्यात येते. कुरिअर पार्सलप्रमाणे गांजा हवाबंद पॅक करुन तो थेट ट्रकमध्ये लोड होतो. वाहतूक करणार्या चालकाला किलोमागे तीन हजार बक्षीस दिले जात असल्याने चालकही कुठेच न थांबता सलग 36 तासांचा अखंड प्रवास करत इच्छितस्थळी पोहोचवितो. अर्थात, सलग चालणारा कायमचा चालक असला तरच त्याला ही जबाबदारी दिली जाते. यामध्ये जुन्नर तालुक्यासह परराज्यातील चालकांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Elections) च्या अनुषंगाने पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) आळेखिंड येथे एसएसटी पथकाची नाकाबंदी सुरु असताना मंगळवारी (दि. 29) पहाटे साडेतीनच्या सुमारास दुधाच्या ट्रकची (एमएच.14, जीयू.8088) तपासणी केली असता चालकाची चलबिचल वाढली. अधिक तपासणी केली असता ट्रकमध्ये 23.719 किलोग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. चालक सुदर्शन गोविंद डोंगरे (वय 24, रा. काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे), देवसुंदर अमलेश मैथी (वय 48, व्यवसाय-चालक, रा. दुर्गाचौक, उत्तर दक्षिण पल्ली, हल्दिया, पूर्व मेदिनीपूर, दुर्गाचौक, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ओडिसा येथून गांजा आणल्याचे कबूल केले.
आरोपींना अटक करण्यात आली असून सदर त्यांच्याकडून 5 लाख 92 हजार 975 रुपयांचा गांजा, 45 लाख रुपयांचा गुन्ह्यात वापरलेला दुधाचा ट्रक (Milk Truck) असा एकूण 50 लाख 92 हजार 975 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Police SeizedCannabis) करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पोपट कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे, दीपक नांगरे, भुजंग सुकाळे, अमित माळुंजे, सचिन कोबल यांच्या पथकाने केली.