संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी दोन वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालकांसह प्रवासी, स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागून गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. चंदनापुरी घाटात देखील काम सुरू असल्याने एकाच लेनवरून वाहने ये-जा करत आहे. त्यातच जुना चंदनापुरी घाटही सुरू करण्यात आला आहे.
पण नियोजनाचा अभाव असल्याने हे अपघात होत आहेत. शुक्रवारी रात्री दोन वाहनांचा एकाच लेनवर समोरासमोर अपघात झाला. दोन्ही वाहने महामार्गावरच होती. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकासह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतुकीचा अक्षरशः फज्जा उडाला होता. क्रेनला पाचारण केल्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.