Sunday, February 15, 2026
HomeराजकीयPune News : काँग्रेस भवनासमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यासह...

Pune News : काँग्रेस भवनासमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यासह पत्रकार जखमी

पुणे । Pune

पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या एका विधानाचे पडसाद आता पुण्यात उमटले आहेत.

- Advertisement -

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठे रणकंदन माजले. या आंदोलना दरम्यान झालेल्या जोरदार दगडफेकीत एक महिला पोलीस कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ता आणि तीन पत्रकार जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

YouTube video player

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना एक विधान केले होते. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. ते एक महान योद्धा होते आणि त्यांच्या शौर्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे.” सपकाळ यांच्या या विधानामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली असून हिंदुत्ववादी संघटनांनीही यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या माफीच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर जोरदार निदर्शने सुरू केली. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. सुरुवातीला घोषणाबाजीने सुरू झालेल्या या आंदोलनाचे रूपांतर काही वेळातच हिंसक राड्यात झाले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि जमावाकडून दगडफेक सुरू झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, पोलिसांच्या उपस्थितीतच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर दगडफेक केली.

या गोंधळात परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, जमावातून अज्ञाताने भिरकावलेला दगड लागल्याने एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. त्यासोबतच, काँग्रेसचा एक कार्यकर्ताही या दगडफेकीत जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, या राड्याचे वार्तांकन करणारे तीन पत्रकारही दगडफेकीच्या विळख्यात सापडले असून त्यांनाही दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, पहिली दगडफेक काँग्रेसच्या बाजूने झाली, त्यानंतर परिस्थिती चिघळली. तर दुसरीकडे, काँग्रेसने भाजपवर हल्ला केल्याचा आरोप करत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीमुळे मंदिरे गजबजली; त्र्यंबकला दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब...

0
नाशिक | Nashik महाशिवरात्री (Mahashivratri 2026) निमित्त जिल्ह्यातील सर्वच शिव मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. पहाटेपासूनच मंदिरांत भाविकांनी मोठी गर्दी केली असून, दर्शनासाठी लांबच...