पुणे | Pune
येथील शनिवारवाड्यात (Shaniwar Wada) नमाज पठण (Namaz Pathan) झाल्याचा दावा भाजपच्या (BJP) खासदार मेधा कुलकर्णी (Medah Kulkarni) यांनी व्हिडीओ शेअर करत केला. यानंतर शनिवारवाडा परिसरात पतीत पावन संघटना आक्रमक झाली असून, वाड्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर खासदार मेधा कुलकर्णी या घटनास्थळी दाखल होत आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी उपस्थित आंदोलकांकडून परिसरात गोमुत्र शिंपडून जागा स्वच्छ करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “शनिवारवाडा हा आमच्या विजयाचे प्रतीक आहे.त्यामुळे यापुढे असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. या ठिकाणी ज्यांनी येऊन नमाज पठण केला आहे, त्या जागेचा शुद्धीकरण आम्ही शिववंदना करून करणार आहोत. आपण याठिकाणी जमलात म्हणून मी सर्वांचं अभिनंदन (Congratulation) करते. अशीच हिंदू शक्ती एकवटून आपण पुढच्या काळात जी काही संभाव्य आक्रमण असतील त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. येथे फक्त हिंदू धर्माच चालेल असे त्यांनी म्हटले.
तसेच “हे आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपार झाला. तो राज्य कारभार ज्या केंद्रातून चालवला गेला ते ऐतिहासिक ठिकाण शनिवारवाडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली आणि मुघलांचा नाश केला. तेच इथे येऊन नमाज पढत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे, तुम्ही नाइलाजास्तव आपला स्वत:चा हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं असेल तर तुम्ही पुन्हा हिंदू धर्मात परत या.अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा”, असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
व्हिडीओत नेमकं काय?
व्हायरल झालेल्या व्हिडीओत शनिवारवाड्याचा परिसर दिसत आहे. यावेळी त्याठिकाणी ६ ते ७ महिला नमाज पठण करताना दिसत आहे. तसेच काही मुलं तिथे खेळताना, तर इतर लोक नेहमीप्रमाणे फिरताना दिसत आहेत. शनिवारवाड्याच्या वरच्या भागातून कोणीतरी हा व्हिडीओ काढल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ १ मिनिटं ६ सेकंदांचा असून, प्रथमदर्शनी हा व्हिडीओ खरा असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.
मेधा कुलकर्णींच्या पोस्टमध्ये काय?
मेधा कुलकर्णी यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, शनिवारवाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे! तसंच त्यांनी चलो शनिवार वाडा! अशी हाकही दिली आहे. रविवार, १९ ऑक्टोबर २०२५, शनिवार वाडा, कसबा पोलीस चौकीसमोर, सायंकाळी ४ वाजता असं सांगत त्यांनी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. पुण्याचे वैभव – शनिवार वाडा, ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार. हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय! पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया! अशी हाक त्यांनी दिली आहे.




