पुणे | Pune
पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज देशभरात सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात सकाळी BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच कार थांबवून भर चौकात लघुशंका केली त्यानंतर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. शास्त्रीनगर येथील एका सिग्नलवर कार थांबवून तरूणाने लघूशंका केली. त्यानंतर अश्लील कृत्य केले. हा सगळा प्रकार एका व्यक्तीने मोबाइलमध्ये शूट केला. नंतर माध्यमांकडे दिला. हे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
या प्रकरणातील तरुणाचे नाव गौरव अहुजा असे आहे. या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असे मनोज अहुजा यांनी म्हटले आहे.
गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. “तरूण अल्पवयीन नाही. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तरूणाने मद्य प्रशान केले होते की नाही, हे ताब्यात घेतल्यानंतर पाहून कारवाई करणार आहोत. पण, सध्यातरी व्हिडिओत बिअरची बॉटल दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर काही कलमे लावण्यात आलेली आहेत,” अशी माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा