पुणे (प्रतिनिधी)
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती विशेष पोलीस शाखेकडून देण्यात आली. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतले आहेत. हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांचा असतो.
48 तासांत देश सोडण्याचे निर्देश
भारताने आता पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा कायमचा बंद केला आहे. तसेच जे पाकिस्तानी नागरिक सध्या भारतात आहेत त्यांना देखील देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅबिनेट सुरक्षा समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर व्हिसा रद्द केले जाणार होते.
निर्णयाला 48 तास उलटले आहेत. त्यामुळे व्हिसा रद्द होण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वैध व्हिसा 27 एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. तर पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय कारणाने दिलेले व्हिसा 29 एप्रिलपर्यंतच वैध असतील. भारताने अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अटारी-वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिलपर्यंत वैध असतील. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी त्यांचा व्हिसा कालावधी संपण्यापूर्वी देश सोडावा. त्यात भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की व्हिसा रद्द करण्याचा निर्णय हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच जारी केलेल्या दीर्घकालीन व्हिसांना लागू होणार नाही आणि त्यांचे व्हिसा ‘वैध’ राहतील.