पुणे | Pune
मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटामध्ये वाद पेटला. या वादातून परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झाली. तणावामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल पथक दाखल झालं. दोन तासांच्या प्रयत्नानंतर यवतमधील परिस्थिती अखेरीस नियंत्रणात आली आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी जमाव जमलेला आहे.
दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर यवतचा आठवडे बाजार दुपारी बारानंतर बंद करण्यात आला आहे. गेल्या आठवडा भरापासून यवतमधील वातावरण तणावग्रस्त आहे. त्यातच आज सकाळी एका तरूणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्यात आणखी भर पडली. या पोस्टनंतर यवतमध्ये दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे दगडफेक आणि जाळपोळ झाली. अनेक घरांवर जोरदार दगडफेक झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले.
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असला तरी गावात तणावाचे वातावरण आहे. सध्या गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.
यवतमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यवत गावातील काही तरुणांनी मशिद तोडल्याचे आणि काही तरुणांच्या घरावर दगडफेक केल्याचे समोर आले आहे. संतप्त जमावाने एका बेकरी गाडीला पेटवून दिले असून, यवतच्या विविध भागांत जेसीबी गाड्या, कार्यालये अशा अनेक ठिकाणी तोडफोड केली. तसेच दुसऱ्या गटाकडून देखील तणाव निर्माण केल्याची माहिती आहे. काल या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे उपस्थित होते. मात्र हा तणाव अद्यापही कायम आहे. काही ठिकाणी जाळपोळ झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची विशेष तुकडी या ठिकाणी दाखल झाली आहे.
या घटनेची दखल घेत स्थानिक पोलिसांनी सोशल मीडियावर सतत नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, यवतसह परिसरात सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचा चिथावणीखोर मजकूर पोस्ट केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





