पुणे | Pune
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले. मंगळवारी पहाटे फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आलेल्या तरुणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने एका शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता. पोलिसांनी आरोपी गाडेच्या मुसक्या आवळल्या. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला.
२६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पुणे पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या शिरूर तालुक्यतील त्याच्या मुळगावी गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता, तर नराधम गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिक नागरिकांची पोलिसांनी मदत घेतली.
तरुणीवरील अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सीसीटीव्ही आणि इतर मार्गाने आरोपीची माहिती काढणे पोलिसांनी सुरू केले. गुन्हा केल्यानंतर जवळपास ७० तास पोलिसांपासून आरोपी लपून राहिला होता. मध्यरात्री पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढला आणि एका कॅनलजवळून आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपी हा गावातच असल्याचे समोर आले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आपली तपास पथके पाठवली होती. आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकासह ड्रोनचीदेखील मदत घेतली.
रात्री नातेवाईकांच्या घरी मदत मागायला गेला
गुनाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी आरोपी दत्तात्रय गाडे रात्री १२ वाजता गेला होता. यावेळी त्याने तिथे खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला द्या. यावेळी नातेवाईकांनी त्याला काही खायला न देता एक पाण्याची बाटली भरुन दिली. यावेळी गाडे याने मी जे केले ते चुकीचे केले, मला पश्चाताप झाला आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचे आहे, असे म्हणाला. त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच चक्रे फिरवत आसपासच्या शेतात त्याचा शोध घेतला. रात्री दीड वाजता पोलिसांना तो शेतात सापडला.
गाडीतच बोलू लागला दत्ता गाडे
आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर लागलीच गाडीमध्ये बसवले आणि पुण्याच्या दिशेने घेऊन जाण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक गोष्टींचा उलगडा केला. स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टॅंड वर जाऊन सावज शोधायचा अशी माहितीदेखील समोर आली. मोबाईलच्या गेल्या दोन महिन्याच्या तांत्रिक विश्लेषणातून माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. आता बलात्कार प्रकरणी आरोपील अटक झाली असून शुक्रवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
दरम्यान, पुणे अत्याचार प्रकरणात ४० जणांची चौकशी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, आरोपीची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षिस देखील घोषित करण्यात आले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा