दिल्ली । Delhi
पुण्यात पुन्हा एकदा सासरच्या छळामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या स्नेहा विशाल झंडगे (वय 25) हिने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. काही दिवसांपूर्वीच वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली होती, आणि आता या नव्या घटनेमुळे पुन्हा एकदा सासरच्या छळाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाचा सासरकडून सातत्याने पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. मानसिक त्रास आणि अत्याचाराला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर स्नेहाच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून, जबाबदारांना तात्काळ अटक करण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी स्नेहाचा पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासू विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक छळ आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, घटनेचा तपास सुरू असून, स्नेहाने आत्महत्येपूर्वी काही माहिती लिहून ठेवली आहे का, हे शोधले जात आहे. तसेच, तिच्या मोबाईलमधील संदेश आणि कॉल रेकॉर्ड्स तपासून सासरकडून छळाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा विवाहातील हुंडाबळी आणि सासरच्या छळाविरोधातील कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.





