Friday, October 9, 2026
Homeराजकीयपुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिर्डी | Shirdi

राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राजकीय पटलावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर महायुतीमधील शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कौस्तुभ गावडे हेच आता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उरले आहेत.

- Advertisement -

मंगेश चिवटे यांनी गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक मतदारसंघातील संपर्क अभियान आणि निवडणुकीची तयारी अत्यंत तीव्र केली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आलेल्या आदेशानंतर त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली. या निर्णयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चिवटे म्हणाले, “मी पक्षाचा एक शिस्तबद्ध व लहान कार्यकर्ता आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जे ठरवतील, तीच आमची पुढील रणनीती असेल.”

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संपूर्ण घडामोडीवर आपली भूमिका मांडली. राज्यातील दुष्काळाचे सावट लवकरात लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे सांगून ते म्हणाले, “तिकीट वाटपात काय घडले यापेक्षा शिवसेनेला महायुती म्हणून सर्व जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. अमरावतीची जागा आपण महायुती म्हणून ताकदीने लढवत आहोत. शिक्षक मतदारसंघाच्या जागांबाबत जे काही मागे-पुढे झाले आहे, त्यावर वरिष्ठ नेते योग्य तो मार्ग काढतील.”

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचे कौस्तुभ गावडे यांच्यासमोर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे जयंत आसगावकर यांचे मुख्य आव्हान असेल. याशिवाय माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक सचिन सानप यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात शड्डू ठोकल्यामुळे ही लढत चुरशीची ठरणार आहे.

दुसरीकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघातून ‘प्रहार’ संघटनेचे उमेदवार नितीन आगे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावर प्रहारप्रमुख बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. “शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक बैठक घेण्याचे मान्य केले आहे. आमची बांधीलकी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आहे. त्यामुळे महायुतीत सुसूत्रता राखण्यासाठी आम्ही अर्ज मागे घेतला आहे,” असे कडू यांनी स्पष्ट केले. तसेच, अमरावतीतील महायुतीचे उमेदवार सरनाईक १०० टक्के निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यातील २५ हेक्टर राखीव जंगलावर तस्करांची पुन्हा कुऱ्हाड; दररोज ४ ते...

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्रीगोंदा शहरापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या अधळगाव रस्त्यालगतच्या सुमारे २५ हेक्टर राखीव वनक्षेत्रात झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू असल्याचे समोर आले...