पुणे | प्रतिनिधी Pune
पुण्यातील हिंजवडी येथील बुधवारी कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही आग अपघाताने नव्हे, तर चालकाकडून हेतुपरस्सर लावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. व्योम ग्राफिक्स कंपनीतील कामगारांचा असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली. चालक जनार्दन हंबर्डीकर याने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले असल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले.
हिंजवडीमध्ये बुधवारी(दि.१९) सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. बसमध्ये एकूण १२ कामगार होते.
दरम्यान, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडी मधील ती घटना अपघात नसल्याचे समोर आले आहे. ही आग अपघाताने नव्हे, तर चालकाकडून हेतुपरस्सर लावण्यात आली. या घटनेत स्वत: चालकाने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली आहे.
चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्याला त्रास दिला होता. त्यामुळेच चालकानं, सूडबुद्धीने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासातून उघडकीस आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. तिघांशी वाद होता त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत शंकर शिंदे, गुरुदास लोखरे, सुभाष भोसले आणि राजन चव्हाण यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला आहे.
जनार्दन हंबर्डीकर या आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. दुसऱ्या दिवशी ड्रॉयव्हर सिटच्या खाली त्या केमिकलची बॉटल ठेवली. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या होत्या.