Friday, November 22, 2024
Homeनगरपुणे ते नगरमार्गे औरंगाबाद रेल्वेमार्ग सुरू व्हावा

पुणे ते नगरमार्गे औरंगाबाद रेल्वेमार्ग सुरू व्हावा

खासदार लंके यांची दिल्लीत रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पुणे-नगर-औरंगाबाददरम्यान झालेले औद्योगिकरण, तसेच धार्मिक स्थळांचा विचार करता सुपा-नगरमार्गे पुणे ते औरंगाबाद रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. रेल्वेमार्ग तसेच रस्त्यांबाबत मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर खा. लंके यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी लंक म्हणाले, औरंगाबाद-नगर-पुणे हा रेल्वेमार्गै महत्त्वाचा आहे. या मार्गावर श्रीक्षेत्र देवगड देवस्थान, शनीशिंगणापूर, शिर्डी, रांजणगाव गणपती अशी तिर्थक्षेत्रे आहेत. त्यांना मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक भेटी देतात.

- Advertisement -

याशिवाय या मार्गावर वाळुंज, औरंगाबाद, सुपा, शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, पुणे अशी औद्योगिक क्षेत्रे आहेत. या मार्गावरून दररोेज मोठ्या संख्येने उद्योजक, व्यापारी, कर्मचारी, कामगार वर्ग प्रवास करतात. पुणे आणि औरंगाबादची वाढती लोकसंख्या, वाहतुकीची समस्या पाहता हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. शिरूर ते औरंगाबाद सहापदरी रस्ता झाल्यास पुण्यातील वाघोलीनंतर भेडसावणारी वाहतुकीची मोठी समस्या कायमची दूर होईल. नगर ते शिर्डी या रस्त्याचे काम गेल्या सहा ते सात वर्षांपासून रखडलेला आहे. नगर ते कल्याण या रेल्वेमार्गाचीही खा. लंके यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली. शेतकर्‍यांसाठी हा मार्ग महत्वाचा असून शेतमालाची वाहतूक कल्याण, मुंबई सारख्या शहरांपर्यंत या मार्गाने सुलभ होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

कांदाप्रश्नी संसदेबाहेर आंदोलन
कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करीत खा. नीलेश लंके यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर कांदा तसेच शेतमालाच्या हमीभावासाठी आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनात संसदेतील गटनेत्या खा. सुप्रिया सुळे, माढा मतदारसंघाचे खा. धैर्यशिल मोहिते पाटील, दिंडोरीचे खा. भास्कर भगरे, शिवसेनेचे नाशिकचे खा.राजा वाजे, काँग्रेसच्या खा. रजनी पाटील, शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदी हे सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेल्या टीडीपी, समाजवादी पार्टीच्या खासदारांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी केली.

वांबोरी रस्त्यांची दुरूस्ती व्हावी
धामोरी-वांबोरी गेट क्रमांक 35 ए बंद केल्यामुळे या मार्गावरील नागरिकांना, वाहन चालकांना गेट क्र.35 बी ओलांडून जावे लागते. रेल्वे हद्दीच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांना जाणे, येणे कठीण होत आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वेकडील रस्त्यांची दुरूस्ती करावी. गेट क्र. 35 बी ओलांडून जावे लागत असल्याने या मार्गावर रेल्वे क्रॉसिंगसाठी उड्डाणपूलही अत्यंत आवश्यक आहे. या भागात देवीचे मंदिर असल्याने आरसीसी ओव्हरब्रीज असावा जेणेकरून देवीच्या मंदिरास कोणतीही क्षती पोहचणार नाही ही बाबही खा. लंके यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

बेलापूर, विसापूर स्थानकांवर थांबा
बेलापूर रेल्वे स्थानकावरील बंद करण्यात आलेली साई फास्ट पॅसेंजर पुन्हा सुरू करावी, तसेच वाराणसी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी एक्सप्रेस या गाड्यांनाही या स्थानकावर थांबा देण्याची मागणी खा. लंके यांनी केली. करोना काळात बंद करण्यात आलेल्या साईनगर ते दादर 11041 व 11042 या दोन गाड्यांना श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणीही लंके यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या