दुबई । वृत्तसंस्था
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुध्द सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने बाजी मारली .
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. नियमित फलंदाज मयंक अग्रवाल काही कारणास्तव संघाबाहेर असल्याने मनदीप सिंगला संधी देण्यात आली.
सलामीला आलेला मनदीप १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल २० धावांवर माघारी परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेला कर्णधार राहुल राशिदच्या गुगलीचा बळी ठरला. त्याने २७ धावा केल्या. त्यानंतर संघाचा डाव कोणीही सावरू शकलं नाही.
मॅक्सवेल (१२), हुड्डा (०), ख्रिस जॉर्डन (७) आणि मुरूगन अश्विन (४) झटपट बाद झाले. निकोलस पूरनने शेवटपर्यंत नाबाद राहत ३२ धावा केल्या आणि संघाला १२६ धावांपर्यंत मजल मारून दिली.
१२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात चांगली झाली. वॉर्नर-बेअरस्टो जोडीने अर्धशतकी सलामी दिली. पण त्यानंतर लगेचच दोघेही बाद झाले. मनिष पांडे आणि विजय शंकर जोडीने काही काळ संघर्ष केला.
पण आव्हानाच्या नजीक पोहोचतानाच हैदराबादच्या डावाला गळती लागली. १६ ते २० या षटकांमध्ये हैदराबादच्या संघाने १७ धावांत तब्बल ७ बळी गमावले. त्यामुळे पंजाबला विजय मिळवता आला. ख्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंगने ३-३ तर मुरूगन अश्विन, रवि बिश्नोई आणि शमीने प्रत्येकी १ बळी टिपला.
हैदराबादविरूद्ध झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीत पंजाबच्या संघाने १२ धावांनी रोमांचक विजय मिळवला. हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पंजाबच्या संघाला २० षटकात १२६ धावांवर रोखलं होतं.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात दमदार झाली, पण नंतर पंजाबचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन आणि इतर फिरकीपटूंचा सामना करताना हैदराबादच्या संघाने १७ धावांत ७ गडी गमावत पराभव पत्करला. हैदराबादच्या हातून विजयश्री खेचून पंजाबने स्पर्धेतील आव्हान कायम राखले.