नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंजाबमधील जालंधर आणि अमृतसरमध्ये मंगळवारी रात्री एकापाठोपाठ झालेल्या दोन भीषण स्फोटांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. जालंधरमधील बीएसएफ मुख्यालयाबाहेर आणि अमृतसरमधील लष्करी तळाजवळ हे स्फोट झाले. देशभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यावर आता नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. पंजाबमधील स्फोटावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हिंदुस्थानात असे स्फोट होताच राहतात. त्यात काय नवीन सांगताय असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता संतापाची लाट उसळली आहे.
काय म्हणाले फारुख अब्दुल्ला
पंजाबमधील दुहेरी स्फोटांनंतर प्रसारमाध्यमांनी अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “हिंदुस्तानात स्फोट होतच असतात, हे काही नवीन नाही. तुम्ही घाबरू नका. या स्फोटामुळे घाबरू नका. देशात स्फोट होणे ही काही नवीन काम नाही. देशात असे स्फोट होत राहतात.” देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या एवढ्या गंभीर मुद्द्यावर अब्दुल्ला यांनी दिलेल्या या ‘अजब’ सल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी आम आदमी पक्षाला धारेवर धरले. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी चिंता व्यक्त केली. BSF मुख्यालयाजवळ झालेला स्फोट चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. इतक्या वर्दळीच्या ठिकाणी डिलिव्हरी स्कूटर लावून एखादा व्यक्ती जात असेल तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्याचे हे चिन्हं आहेत. एकीकडे राज्य सरकार राष्ट्रपतींसमोर त्यांच्या आमदारांची परेड करण्यात गुंतली आहे, तर दुसरीकडे या स्फोटाची जबाबदारी घेण्यापासून केंद्र सरकारही कचरत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानेक केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी (५ मे) रात्री पंजाबमध्ये तीन तासांच्या अंतराने दोन मोठे स्फोट झाले. जालंधरमध्ये रात्री ८ वाजता बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये जोरदार स्फोट झाला. सीसीटीव्हीमध्ये एक संशयित व्यक्ती वस्तू ठेवताना दिसत आहे. या स्फोटात बीएसएफचा एक अधिकारी जखमी झाला. जालंधरनंतर काही वेळातच अमृतसरच्या ‘खासा’ येथील लष्करी छावणी परिसरात दुसरा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र लष्करी तळाजवळ स्फोट झाल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.





