Sunday, September 8, 2024
Homeनगरपुणतांबा ग्रामपंचायतला राज्यस्तरीय शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

पुणतांबा ग्रामपंचायतला राज्यस्तरीय शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा-रास्तापूर ग्रामपंचायतीला राज्यस्तरावरील दुसर्‍या क्रमांकाचा व नाशिक विभाग स्तरावरील प्रथम क्रमाकांचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय धनवटे व ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे यांनी दिली.

- Advertisement -

राज्य शासनाच्या 2018 व 2019 या वर्षासाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराची घोषणा झाली. नाशिक विभाग स्तरावरील राहाता तालुक्यातील पुणतांबा-रास्तापूर ग्रामपंचायतीला 2018 साठी ग्रामपंचायत या गटात राज्य स्तरावरील दुसर्‍या क्रमांकाचा व नाशिक विभाग स्तरावरील प्रथम क्रमाकांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी 1988 पासून शासनातर्फे महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2011 पासून या पुरस्काराचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार असे करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र या स्वरुपात देण्यात येणार आहे. राज्य स्तरावरील दुसर्‍या क्रमांकासाठी 75 हजार रूपये रोख रक्कम व विभाग स्तरावरील प्रथम पुरस्कारासाठी 50 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. विभाग स्तरावरील पुरस्काराचे वितरण 10 डिसेंबर 2022 पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते विभागस्तरावर करण्यात येणार आहे. पुणतांबा गाव पातळीवर रोपवाटिका, वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे सर्वांच्या सहकार्याने हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सरपंच धनवटे यांनी सांगितले.

सह्याद्री वृक्ष वाटिका मधील लागवड व संवर्धन करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व साईधाम ट्रस्ट शिर्डी तसेच अनेक सेवाभावी संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी मदत केलेली आहे. पुणतांबा गावामध्ये 10-12 बायोगॅस प्रकल्प आणून पुणतांबा गाव अव्वल स्थानी आहे. राज्यात सर्वाधिक झाडे लावण्याचा मान पुणतांबा गावाला मिळालेला आहे. त्याचे संवर्धन व जतन करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू आहे. महिलांनी यामध्ये अधिक सहभाग नोंदवल्यामुळे हे शक्य झाले असे नवनिर्वाचित उपसरपंच ज्योती पवार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या