Tuesday, May 28, 2024
Homeनगरपुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय नेत्यांची सावध भूमिका

पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय नेत्यांची सावध भूमिका

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र या निवडणुकीत थेट सहभाग असावा की नाही याबाबत वरिष्ठ नेत्यांनी अद्याप ठोस भूमिका न घेता सावध पवित्रा घेतलेला आहे.

- Advertisement -

पुणतांबा गाव राहाता तालुक्यात येते. मात्र त्याचा समावेश कोपरगाव विधानसभा मतदार संघात आहे. यामुळे पुणतांबा गावाशी व तेथील राजकारणाशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोष काळे तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा थेट संपर्क आहे. तिनही नेत्यांना मानणारे कार्यकर्ते व त्यांचे भक्कम गट पुणतांबा गावात व परिसरात आहेत. पुणतांब्याच्या स्थानिक राजकारणात त्यांचा हस्तक्षेप असतो. मागील पंचवार्षिक निवडणुकीत ना. विखे यांना मानणारा गट सत्तेत होता. तर त्याच्या आगोदर माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या गटाच्या ताब्यात सत्ता होती. आ. काळे यांचे समर्थक सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्या-त्या नेत्यांच्या समर्थकांनी त्यांच्या हायकमांडच्या भेटी-गाठी घेणे सुरु केले आहे.

सरपंचपदाचा उमेदवार कोण असावा याबाबत विशेष खलबते सुरू झाली आहेत. मात्र जशी जशी निवडणूक जवळ येईल तशा हालचाली वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या तरी हायकमांडने कार्यकर्त्यांना झटून कामाला लागा अशा सूचना केलेल्या आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणुका पक्ष तसेच पक्षाच्या चिन्हावर न लढता स्थानिक पातळीवरील पॅनेलमध्ये लढल्या जातात. त्यामुळे पुणतांबा -रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सहभाग घ्यावयाचा की नाही याबाबत हायकमांडमध्ये संभ्रम असल्याची चर्चा आहे. कारण ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर पुढील वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालाचा परिणाम दोन्ही निवडणुकीवर होणार आहे.

पुणतांब्या जवळच असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाचा परिणाम पुणतांबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गणेश कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी थेट सहभाग घेतला व युवा नेते विवेक कोल्हे यांना खंबीर साथ दिली.त्यामुळे गणेश कारखान्यात सत्तांतर झाले. या निकालाची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली. शेतकरी संपाचे गाव म्हणून असलेल्या पुणतांबा रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवा नेते विवेक कोल्हे थेट निवडणूक मैदानात उतरणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना मानणारा मोठा गट पुणतांब्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत आ. थोरात यांनी पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालावे त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून सध्या काही जण जोरदार प्रयत्न करत आहे. सध्या तरी या सर्व वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला असून परिस्थितीचा अंदाज घेऊन आगामी काळात त्यांची भूमिका ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या