पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा परिसरात सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत अंदाजे सव्वादोन इंच पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे परिसरात खरीप पिकांच्या पेरणीला चालना मिळणार असल्यामुळे परिसरातील बळीराजा सुखावला आहे. काल पासून खरीप पिकांच्या पेरणीसाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. परिसरात चालू पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी दोन इंच पावसाची नोंद झाली होती; मात्र पुरेशा पावसामुळे खरीप पिकांच्या पेरण्या खोळबंल्या होत्या.
मात्र सोमवारी दिवसभरात सरासरी सव्वा दोन इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत परिसरात एकूण साडेचार इंच पाऊस पडल्याची माहिती महाराष्टू राज्य शेती महामंडळाच्या चांगदेवनगर येथील मळ्यावरील लिपिक सुनिल कराळे यांनी दिली आहे. पावसामुळे पुणतांबा तसेच चांगदेवनगर परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. तसेच गावातील बाजारपेठ रस्ता व स्टेशनरोड वर असलेल्या रसत्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते . तसेच बर्याच ठिकाणी नांगरट केलेल्या शेतातून सुद्धा पाणी वाहत असल्याचे दिसून येत होते.
येत्या दोन तीन दिवसात शेतात वापसा आला तर खरीप पिकांच्या पेरण्या हमखास होतील, असा विश्वास शेतकरी वर्गाने स्पष्ट केला आहे. खरीप पिकाच्या पेरणीसाठी बहुतांशी शेतकर्यांनी बी-बियाणे तसेच आवश्यक रासायनिक खतांची अगोदरच खरेदी करून ठेवली आहे. तसेच शेतातील पेरणीपूर्व मशागतींची कामे आगोदरच पूर्ण झालेली आहे. सोयाबीनला मागील वर्षी चांगला भाव मिळाल्यामुळे बहुतांशी शेतकरी वर्गाचा कल सोयाबीन पिकाकडे आहे. सोयाबीनबरोबरच मका, बाजरी, मूग पिकाचे क्षेत्र सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे परिसरातील वातावरण बदलल्याचे चित्र दिसून येत आहे.