पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
ऑगष्ट महिन्यातील तिसरा आठवडा सुरू झालेला असताना परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नसल्यामुळे परिसरातील खरीप पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. गोदावरी नदीला जरी पाणी वाहत असले तरी गोदावरी नदी काठचा भाग वगळता इतर ठिकाणी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी विहिरीचे तळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडू लागली आहेत. त्याचबरोबर गवतही हळूहळू वाळू लागले आहे. परिसरात अनेक शेतकर्यांकडे पशुधन आहे. बहुतांशी शेतकरी वर्गाकडे मुरघासाची व्यवस्था असली तरी पावसाअभावी हिरव्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पाण्याचा प्रश्न गृहीत धरून ज्या शेतकर्यांकडे थोडेफार उसाचे क्षेत्र आहे. त्यांनी जनावरांसाठी चारा म्हणून ऊस विकण्यास सुरुवात केली आहे. जागेवर प्रति टन 3 हजार रुपये तर घरपोहच 3500 रुपये असा सध्या दर असून येत्या 8 दिवसांत पाऊस पडला नाही तर भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. घासाचे दरही वाढले असून पावसाअभावी मका पिकाला सुद्धा फटका बसला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे.