Thursday, October 15, 2026
Homeमुख्य बातम्यापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : तिसऱ्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ४...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : तिसऱ्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ६९१ शेतकऱ्यांचा समावेश

पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन

- Advertisement -

नाशिक, दि. १३ ऑक्टोबर २०२६ (जिमाका):

राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, नुकताच जाहीर झालेलया तिसऱ्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ६९१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत ४४ हजार ३८७ शेतकऱ्यांची नावे पात्र लाभार्थी यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यापैकी ३६ हजार १६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २३ हजार ७७१, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ४२ हजार २३५ अशा एकूण ६६ हजार ६ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

तीन टप्प्यांत लाभार्थी याद्या प्रसिद्ध
जिल्ह्यात २८ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत ३५ हजार ८९० शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी ३३ हजार ३७३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत ३ हजार ८०६ शेतकरी असून, त्यापैकी २ हजार ७९४ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या यादीत ४ हजार ६९१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

कर्जखात्याची माहिती तपासून ई-केवायसी करा
योजनेत समाविष्ट पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची खातरजमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे.

या योजनेतील शेतकऱ्यांची कर्जाची थकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जथकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांचे संबंधित कर्ज शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार पूर्णपणे निरंक करण्यात येणार आहे.

मृत व वयस्कर लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यपद्धती
योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी मृत झालेले तसेच वयस्कर आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याच्या अनुषंगाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी तातडीने जवळच्या आपले सरकार केंद्रात किंवा ई-सेवा केंद्रात भेट देऊन विनामूल्य आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार, कर्जाची रक्कम किंवा बँक कर्जखात्याच्या क्रमांकाबाबत तक्रार असल्यास आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेच्या शाखेशी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा.

पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कुंदन भोळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार; निफाडमध्ये ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम

0
नाशिक, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सन्मान यांना प्राधान्य देण्यासाठी सेवा...