पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
केंद्र सरकारने चालू वर्षी सोयाबीनसाठी (Soybeans) 4 हजार 892 हमीभाव जाहीर केला आहे. मात्र दर पडल्याने व्यापार्यांकडून 4200 ते 4300 या पडीच्या भावात सोयाबीनची (Soybeans) खरेदी सुरू आहे. यामध्ये शेतकर्यांची मोठी लूट होत आहे. अद्याप पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) परीसरात एकही हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने परिसरातील शेतकर्यांनी सोयाबीन कोठे घालायचे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हमीभाव खरेदी केंद्राच्या प्रतिक्षेत आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी 8 हजार प्रति क्विंटल असणारे सोयाबीनचे दर सध्या 4300 च्या आसपास आले आहेत. काही ठिकाणी तर त्यापेक्षाही कमी दरात खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. केंद्र सरकारने सोयाबीनला 4892 चा हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात सातशे ते आठशे रुपये दराची तूट शेतकर्यांना सहन करावी लागत आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राज्यभर हमीभावात सोयाबीन खरेदी केंद्र (Soybean Buying Center) सुरू केली आहेत. 1 ऑक्टोबरपासून नोंदणी, 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
एनसीसीएफच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत (Karjat), कोपरगाव (Kopargav), पाथर्डी (Pathardi), श्रींगोदा (Shrigonda), पारनेर (Parner), राहुरी (Rahuri), शेवगाव (Shevgav) या सात ठिकाणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात राहाता तालुक्याचा समावेश नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादक शेतकरी आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आपल्याकडील सोयाबीन नेमके कोणत्या केंद्राला द्यायची या संभ्रमात शेतकरी वर्ग आहे. शासनाने तातडीने पुढाकार घेत राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) परिसरामध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.