Monday, November 25, 2024
Homeब्लॉगरुद्रदेव नव्हे राणी रुद्रमा देवी!

रुद्रदेव नव्हे राणी रुद्रमा देवी!

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

रूद्रमा देवी यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून आपल्या वडिलांबरोबर राज्यकारभार करण्यास रूद्रदेव या नावाने सुरुवात केली. रूद्रमादेवी यांना एक बहीण होती. तिचे नाव जनपमादेवी होते. परंतु वडिलांनी रूद्रमा या आपल्या मोठ्या मुलीला राज्याचा उत्तराधिकारी म्हणून आणि काकतीय वंश पुढे चालवणारी म्हणून घोषित केले.

जेव्हा रूद्रदेव हे पुरुष नसून स्री आहे आणि तिला राज्याचा उत्तराधिकारी म्हणून नेमले गेले आहे हे राज्यातील आप्तस्वकीयांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी विरोध केला. शेजारील यादव राजे आणि इतर राजे नाराज झाले. एका स्त्रीने राज्यकारभार करावा आणि आपण तिच्या हाताखाली काम करावे, तिचे मांडलिक बनून राहावे हे पुरुषसत्ताक राज्यकर्त्यांना अजिबात मान्य नव्हते. परंतु रूद्रमादेवींनी आपल्या लोककल्याणकारी राज्यकारभारातून आणि परक्रमाने वेळोवेळी शत्रूच्या मुसक्या बांधल्या. त्यामुळे राणीच्या पराक्रमाबद्दल, राज्यकारभाराबद्दल कुणालाही तीळमात्र शंका राहिली नाही. तेव्हा आप्तेष्टांनी, जनतेने व शेजारील राजा या सर्वांस राणी रूद्रमास राज्यकर्ती म्हणून मान्यता देणे क्रमप्राप्त ठरले. राणी रूद्रमादेवींना प्रशासक म्हणून सर्वांनी स्वीकारणे ही त्या काळातील खूप मोठी क्रांतिकारक घटना म्हणावी लागेल. महाराज गणपती देव यांच्या मृत्यूनंतर राणी रूद्रमादेवी यांना वैदिक मंत्रोच्चारात पुरोहित ब्राह्मणांनी राज्याभिषेक केला.

- Advertisement -

राणी रूद्रमादेवींनी आपल्या राज्यकारभाराची सुरुवात रूद्रदेव या नावानेच केली. राणीने आपल्या राज्यात शिलालेख खोदून घेऊन त्यावर रूद्रदेव या पुरुष नावाचाच उल्लेख केला आहे. विवाह योग्य झाल्यावर राणी रूद्रमादेवी यांचा विवाह चालुक्य वंशाचा राजकुमार वीरभद्र यांच्याबरोबर झाला. विवाहनंतर राणी रूद्रमादेवी यांनी दोन मुलींना जन्म दिला. राज्याची आणि संसाराची जबाबदारी राणी रूद्रमाने यशस्वीपणे निभावली.

काकतीय साम्राज्यावर जेव्हा यादव राजा महादेव यांनी आक्रमण केले तेव्हा जराही न घाबरता राणी रूद्रमादेवी यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि शौर्याने शत्रूचा पराभव केला. परंतु पुन्हा नव्या जोमाने शत्रूने काकतीय साम्राज्यावर वार केला तेव्हा रूद्रमादेवींनी आपल्या अफाट सहसाचा परिचय देत त्याच्या सर्व हल्ल्यांना परतावून लावले. आपल्या कार्यकाळात अंतर्गत आणि बाह्य शत्रूला तोंड देत असतानाच त्यांनी प्रजाहिताची अनेक कामे केली. समानतेसाठी काम केले. राज्यातील न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी भरीव कार्य केले. जनता आणि अधिकारी यांच्यात समानता राहावी, राज्यामध्ये कायम शांतता नांदावी यासाठी राणीने मोठे काम केले. निम्न जातीतील युवकांना सैनिक म्हणून काम करण्यास निवडले. त्यांना काही अधिकार दिले. राणीने केलेले हे मोठे बदल पुढे तिचे उत्तराधिकारी आणि विजयनगरच्या साम्राज्यातही स्वीकारले गेले.

अनेक इतिहासकारांनी राणी रूद्रमादेवीच्या शासन काळास सुवर्णयोग म्हणून संबोधले आहे. राणी रूद्रमादेवी कायमच काकतीय साम्राज्याची ढाल बनून राहिली.

सन 1280 च्या काळात राणी रूद्रमादेवी यांनी आपला नातू युवराज प्रताप रूद्रदेव याची युवराज म्हणून नियुक्ती केली. जेव्हा सन 1285 मध्ये पंजिया, यादव, होसैल यांनी राणीविरुद्ध एकत्र येऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणी रूद्रमाने आपला नातू प्रताप रूद्रदेव याला बरोबर घेऊन शत्रूशी दोन हात करून मोठा विजय प्राप्त केला. एक महिला राज्याची उत्तराधिकारी बनू शकत नाही ही लोकांमधील विचारधारा रूद्रमादेवींनी आपल्या पराक्रमाने आणि दृढ निश्चयाने खोटी ठरवली. स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत हे पराक्रमातून दाखवून दिले.

राणी रूद्रमादेवी यांचा मृत्यू 1289 मध्ये अंबादेव यांच्याशी लढताना झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे, तर काही इतिहासकार तिचा मृत्यू 1295 मध्ये झाला असे म्हणतात. इतिहासकारांच्या मते गोवळकोंडा या किल्ल्याच्या निर्मितीमध्ये रूद्रमादेवी यांचे मोठे योगदान होते. ओरुगळ किल्ल्याचे निर्माणही त्यांनी केले. राणी रूद्रमा यांनी प्रजेसाठी केलेल्या कार्यामुळे आजही लोक त्यांना फक्त राणी रूद्रमा न म्हणता राणी रूद्रमादेवी म्हणून संबोधतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या