Saturday, November 9, 2024
Homeनगरजिल्ह्यात रब्बीची अवघी 38 टक्के पेरणी

जिल्ह्यात रब्बीची अवघी 38 टक्के पेरणी

खरिपाच्या काढणीमुळे पेरणी लांबणीवर || ज्वारीचे क्षेत्र वाढले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमाने येण्याच्या आशा वाढल्या आहेत. मात्र त्याप्रमाणात रब्बीच्या पिकांची पेरणी झाली नसल्याचे आढळून येत आहे. अजूनही खरीप हंगामातील अनेक पिकांची काढणी झाली नसल्याने रब्बीची पेरणी लांबणीवर पडली असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत 2 लाख 9 हजार 499 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाली आहे. म्हणजे 37.86 टक्के पेरणी झाली असून पक उगवण अवस्थेत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अजूनही काही भागात कापूस वेचणी सुरू असून तर काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच तूर पीक कोमेजताना दिसत आहे. त्याबाबत कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. कृषी विभागाने रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार यंदा हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. ज्वारीसाठी 2 लाख 67 हजार 834 हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 22 हजार 598 म्हणजे 45.77 टक्के पेरणी झाली आहे. मका पिकाची 102 टक्के पेरणी झाली आहे. या पिकासाठी 14 हजार 118 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. मात्र यंदा 14 हजार 449 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हासाठी 86 हजार 404 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत 17 हजार 778 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.

हरभरासाठी 88 हजार 376 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत 24 हजार 232 हेक्टरवर म्हणजे 27.43 टक्के पेरणी झाली आहे. जवससाठी 15 हेक्टरचे नियोजन असून 19 हेक्टरवर म्हणजे 126. 67 टक्के पेरणी झाली आहे. तिळचीही तीच स्थिती आहे. 110.4 टक्के पेरणी झाली आहे. सुर्यफुलाचे क्षेत्र 31.4 हेक्टरचे नियोजन असून आतापर्यंत 17 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊसाची नव्याने लागवड 30.48 टक्के झाली आहे. त्यासाठी 94 हजार 693 हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 28 हजार 858 हेक्टरवर लागवड झाली आहे.

पिकांची पैसेवारी 50 पेक्षा अधिक
जिल्ह्यातील 585 गावे खरीप हंगामी पिके तर 1 हजार 21 गावे रब्बी हंगामी आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 606 गावांमधील पिकांची पैसेवारी 50 पेक्षा अधिक आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती चांगली आहे. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यातील दक्षिण भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर, नगर हे तालुक्यात खरीप हंगामाची पिके जास्त घेतली जातात. जिल्ह्यातील 585 गावे खरीप हंगामी पिके घेतली जातात. सर्व तहसीलदारांनी तालुक्यातील पिकांचा आढावा घेतला आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील 1 हजार 606 गावांची पैसेवारी 50 पेक्षा अधिक आहे. 50 पेक्षा कमी पैसेवारी असल्यास संबंधित गावाला दुष्काळी उपाययोजना लागू होतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या