Tuesday, March 25, 2025
Homeनगरजनाधार गमावलेल्या शरद पवार यांनी कायमस्वरूपी घरी बसावे- ना. विखे

जनाधार गमावलेल्या शरद पवार यांनी कायमस्वरूपी घरी बसावे- ना. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शरद पवार यांना विनंती आहे की, आपण जाणते राजे आहात. आपण जनाधार गमावलेला आहे. आता तुम्ही कायमस्वरूपी घरी बसा. अनेक लोकांचे वाटोळे तुम्ही केले आहे आणि आणखी जनतेचे आणि राज्याचे वाटोळे तुम्ही करू नका, असा खोचक टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी शिर्डीत श्री साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, निलेश कोते, अमित शेळके आदी उपस्थित होते.

- Advertisement -

दर्शनानंतर ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात किंतु परंतु असं मला काही दिसत नाही. काही माध्यमांनी ते नाराज असल्याचे रान उठवले आहे. पण तसं मला काही वाटत नाही. अतिशय मनमोकळेपणाने त्यांनी केंद्रीय नेतृत्व जी भूमिका घेईल, ती आम्हाला मान्य असेल असे सांगितले. त्यामुळे ते नाराज असल्याचा काही प्रश्नच नाही. राज्याचे मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी म्हटले, आमच्या पक्षाचे नेतृत्व आमची चॉईस देवेंद्र फडणवीसच आहे. आपणास मंत्रिमंडळात कोणते खाते मिळेल याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले, याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाच दिले आहेत. यापूर्वी देखील दिले. मी म्हटल्याप्रमाणे वेगळं मागायचे काही कारण नाही. पक्ष नेतृत्वाला माझ्याबद्दलचा जो विश्वास आहे त्यामुळे निश्चितपणे चांगली जबाबदारी मला देतील याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी यापुढील निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याच्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले, आता पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर, राष्ट्रवादी उबाठावर, त्यामुळे हे एकप्रकारे पळवाटा शोधण्याचे काम सुरू आहे. जनाधार राहिला नाही. तो आता गमावला आहे. हे कुठंतरी त्यांना मान्य करावे लागेल. इतकी बेताल विधाने केली गेली. मला अपेक्षा ही नव्हती कि, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री यांच्याबद्दल बोलायचे. एवढी बेताल विधाने करणारा माणूस मी कधी पाहिला नाही. त्याचे शासन लोकांनी त्यांना दिले आहे. पुढच्या काळात सत्तेसोबत जायचे कि सत्ते बाहेर राहायचे या बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना म्हटले कि, यामध्ये महायुतीला काय फायदा आणि तोटा होईल हा मुद्दाचं नाही. ज्या बच्चू कडू यांनी महायुती सरकारला जे पाठबळ दिले, त्यांची धोरणे मान्य केली.

दिव्यांगांची धोरणे मान्य केली. अशा सरकारची प्रतारणा करून त्यांनी विश्वासघात दाखवला आहे. त्यामुळे मला वाटत नाही कि त्यांना महायुतीत सामील करून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून शेवटी निर्णय नेतृत्वाने घ्यायचा आहे. अशा बेजबाबदारपणे वक्तव्य करणार्‍या लोकांना ज्यांनी सरकारचे पाठबळ घेऊन मोठेपण मिळवले अशा विश्वासघात करणार्‍या मग ते बच्चू कडू असो अगर कोणी असो त्यांना घेऊ नये असंच आमचं मत आहे. ईव्हीएम मशीनवर सध्या खापर फोडले जात आहे, आमचा पराभव झाला असं शरद पवार आणि सगळेच म्हणतात. या प्रश्नावर उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, या लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की, लोकसभेला एवढे घवघवीत यश तुम्हाला मिळाले. आमच्या महायुतीची एवढी पीछेहाट झाली. त्यावेळी ईव्हिएमवर का नाही शंका व्यक्त केली.

आमचा ईव्हिएम वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या सर्व खासदारांनी त्याचवेळी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट भाषेत सांगितले होते कि, निकाल तुमच्या बाजूने लागला तर ईव्हिएम चांगले आणि जनमत तुमच्या विरोधात गेले तर ईव्हीएम वाईट आहे. जिल्ह्यात बाराच्या बारा जागा आम्ही जिंकू, असे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणत होते. मात्र अवघ्या दोन जागेवर त्यांना समाधान मानावे लागले. यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, श्रीरामपूर मतदारसंघात आमच्या आपापसातील मतभेदांमुळे ती जागा गेली. वास्तविक ती जाण्याचे काही कारण नव्हते. कर्जत-जामखेड मतदारसंघात स्थानिक परिस्थितीच्या कारणास्तव आ. राम शिंदे यांचा हजार मतांनी पराभव झाला. अन्यथा जिल्हा हा आपण बारा शून्य केला असता. बाळासाहेब थोरात यांचे जे 12/0 असेेेे स्वप्न होते ते आपण निश्चितच पूर्ण केले असते, असेही त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...