शिर्डी | प्रतिनिधी
जेष्ठनेते गुलाब नबी आझाद यांनी कॉंग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष आता चार-दोन नेत्यांचाच राहील असा टोला महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
कॉंग्रेस पक्षात लोकशाहीसाठी यापुर्वी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनीही संघर्ष केला होता, मात्र त्यांनाही त्याची किंमत चुकवावी लागली होती याची आठवणही त्यांनी पत्रकारांशी बोलताना करुन दिली.
शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मी जेव्हा कॉंग्रेस पक्ष सोडला त्यावेळीही अशीच परिस्थिती होती. यामध्ये बदल न झाल्यामुळेच पक्षाचे असंख्य नेते आता बाहेर पडत आहेत. गुलाबनबी आझाद यांनीही ज्या मुद्यांच्या आधारे पक्षाचा राजीनामा दिला ही परिस्थिती तशीच राहीली तर कॉंग्रेस पक्षात चार-दोन नेतेच दिसतील असा टोलाही त्यांनी लगावला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. एक काळ या राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडेच होते. त्यांच्या कार्यकाळात राज्यात कॉंग्रेस पक्षाची कशी वाताहत झाली हे जनतेने पाहीले आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयेवर फारसे बोलण्याचे कारण नाही असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
उर्वरित आमदार तरी तुमच्या जवळ राहतील का?
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या झालेल्या युतीवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेने कोणाबरोबर युती करावी हा सर्वस्वी आधिकार त्यांचा आहे, परंतू आता जनाधार गमावलेल्यांना कोणाचातरी आधार शोधण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मान्य नसल्यामुळे चाळीस आमदार तुमच्यापासुन दुर गेले. नव्या युतीमुळे उर्वरित आमदार तरी तुमच्या जवळ राहतील का याचे आत्मपरिक्षण उध्दव ठाकरे यांनी करण्याची वेळ आता आली असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.