राहाता |प्रतिनिधी| Nilwande
निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा मोठा दिलासा जिरायती भागातील गावांना मिळाला आहे. या पाण्यामुळे गावातील बंधारे, पाझर तलाव भरले गेल्याने शेतकर्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून, या क्षणाचा आनंद शेतकर्यांनी जलपुजन करुन व्यक्त केला आहे. केलवड येथे महसूल तथा पालकमंत्री ना.र ाधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पाण्याचे पूजन करुन, शेतकर्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असला तरी, अद्यापही धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहीले आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचीही चिंता शेतकार्यांना लागलेली आहे. अशा परिस्थितीत महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यांना सोडण्याच्या सुचना जलसंपदा विभागाच्या आधिकार्यांना दिल्या होत्या. यामुळे कालव्यातील पाण्याचा मोठा लाभ लाभक्षेत्रातील जिरायती भागाला झाला आहे.
या ओव्हर फ्लोच्या पाण्यामुळे गावातील पाझर तलाव, बंधारेही भरले गेल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या सुटण्यास मोठी मदत झाली. पाण्याच्या निर्णयाचे मोठे समाधान जिरायती भागातील शेतकर्यांमध्ये आहे. केलवड येथे झालेल्या कार्यक्रमात ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपुजन करुन शेतकर्यांनी हा आनंद व्दिगुणीत केला.
लोणी खुर्द, मापारवाडी, प्रिपी निर्मळ, आडगाव या गावांमध्येही डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. कालव्यांच्या पाण्यामुळे या गावातील बंधारे, पाझर तलाव पूर्णपणे भरल्याने या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनाही ओव्हर फ्लोच्या पाण्याचा मोठा आधार मिळाला आहे.
अद्यापही तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परंतू धरणं भरल्याचे समाधान आहे. ओव्हर फ्लोच्या पाण्याचा लाभ शेतकर्यांना मिळावा यासाठी पुढाकार घेवून जलसंपदा विभागाच्या आधिकार्यांना कालव्यातून पाणी सोडण्याची सुचना आपण दिल्या होत्या. शेवटच्या गावाला पाणी मिळेल असे नियोजन करण्यास आपण आधिकार्यांना सांगितले आहे.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील