Monday, June 17, 2024
Homeनगरशिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करा - ना. विखे

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करा – ना. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मुंबईतील शासकीय निवासस्थानी या वसाहतीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीच्या कामाचा विविध विभागाकडून आढावा घेतला. शेती महामंडळाच्यावतीने 500 एकर जमीन औद्योगिक महामंडळाला विनाशुल्क देण्यात आली आहे. यामुळे या जागे संदर्भातील सर्व सोपस्कार महामंडळाने तातडीने पूर्ण करून उद्योजकांना तातडीने जमीन वाटप करण्यात येईल यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सदर बैठकीला उद्योग मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी संतोष भिसे, मुंबईचे भूमी व्यवस्थापक बप्पा थोरात, पुणे एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अभियंता, उपवनसंरक्षक अधिकारी नगर, गोदावरी प्रकल्प कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता महावितरण तथा इतर विभागीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी या वसाहतीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पाणी, रस्ते, वीज या सुविधांचा आढावा घेतला. या सुविधांसाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने मिळतील याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी आणि येणार्‍या अडचणी दूर करण्याबाबत सुचित केले.

ना. विखे पाटील यांनी यावेळी उद्योजकांना जागेची पाहणी करता यावी यासाठी साफसफाई करून घ्यावी आणि जागेवर फलक लावून घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर रस्त्यांची आखणी करून घेण्याचेही त्यांनी सांगितले. सदर वसाहतीमुळे नगर, शिर्डी तसेच आसपासच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून येणार्‍या काळात शिर्डी धार्मिक क्षेत्राबरोबर राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारूपाला आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा आत्मविश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या