Tuesday, October 22, 2024
Homeक्रीडाRafael Nadal Retirement : 'क्ले कोर्ट'चा बादशाह राफेल नदालचा 'टेनिस' ला अलविदा

Rafael Nadal Retirement : ‘क्ले कोर्ट’चा बादशाह राफेल नदालचा ‘टेनिस’ ला अलविदा

मुंबई | Mumbai
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्तीची घोषण केली आहे. २२ वेळा ग्रँड्स स्लॅम पटकवणाऱ्या राफेल नदालने डेविस कपच्या फायनलनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. राफेल नदालने गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. या व्हीडिओमध्ये बोलताना राफेलचे डोळेही पाणावले.

राफेल नदाल याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणाला,”मी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो आहे. मागील काही वर्षे माझ्यासाठी कठिण स्वरुपाची राहिली आहेत. खासकरुन मागील दोन वर्षे माझ्यासाठी फार कठीण होती. त्याने खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना डेव्हिस कप फायनल असेल. ही तीच स्पर्धा आहे जिथून त्याने २००४ मध्ये यशस्वी कारकिर्दीला सुरुवात केली होती. यादरम्यान आपली १०० टक्के कामगिरी करू शकला नाही आणि म्हणूनच तो हा कठीण निर्णय घेत आहे. नदालने १२ भाषांमध्ये पोस्टच्या कॅप्शनमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

आपल्या कारकिर्दीत नदालला साथ देणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले. आपल्या कारकिर्दीचा बराच काळ ज्यांच्यासोबत घालवला त्या प्रतिस्पर्ध्यांचेही त्याने आभार मानले. नदालने रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचसोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने आपल्या आईचेही आभार मानले. आईच्या त्यागामुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो, असे नदालने सांगितले. १९ वर्षांपासून त्यांच्याबरोबर असलेल्या पत्नी मेरीचेही त्यांनी आभार मानले. नदालच्या मते, त्याच्या काकांनी त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामुळे त्याने टेनिस खेळायला सुरुवात केली.

नोव्हेंबरमध्ये डेव्हिस कप
नदाल शेवटची स्पर्धा नोव्हेंबरमध्ये मलागा येथे होणाऱ्या डेव्हिस कप फायनल मध्ये खेळणार आहे. त्यानंतर तो व्यावसायिक टेनिसचा निरोप घेईल. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान डेव्हिस कपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. नदाल दुखापतीतून बरा झाल्यानंतर त्याला संघात सामील करण्यात आले आहे. २००४ मध्ये नदालने स्पेनला डेव्हिस कप जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

२२ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदावर कोरले नाव
नदालने आपल्या कारकिर्दीत २२ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावून अलौकिक कामगिरी केली. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत नदाल टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळला. पण त्याच्या काकांची इच्छा होती की त्याने टेनिसमध्येच करिअर करावे. नदालचे काका टोनी नदाल हे एक प्रसिद्ध फुटबॉलपटू होते. तरीदेखील त्यांनी फुटबॉलचा आग्रह न धरता टेनिस खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्याने त्याच्या कारकिर्दीत १२ फ्रेंच ओपन, दोन ऑस्ट्रेलियन ओपन, दोन विम्बल्डन आणि चार यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकले आहे. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरी प्रकारात सुवर्णपदक आणि २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. इतकेच नाही तर २००४, २००९, २०११ आणि २०१९ मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही नदाल भाग होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या