Sunday, October 20, 2024
Homeनगरशिर्डीत विखेंसमोर आव्हान उभे करण्याचा आघाडीचा प्रयत्न

शिर्डीत विखेंसमोर आव्हान उभे करण्याचा आघाडीचा प्रयत्न

राहाता | Rahata

साईबाबा देवस्थानमुळे हा मतदारसंघ राजकीय पटलावर कायम चर्चेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव करत 87 हजार मताधिक्यांनी विखे पाटील यांनी मोठा विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत मात्र गणेश कारखान्याबरोबरच नगर दक्षिण लोकसभेत भाजपचा पराभव झाल्याने विधानसभेत विखेंना घेरण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडल्या. विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद झुगारून 2019 च्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये दाखल झाले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा वरचष्मा आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विखे पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कंबर कसली आहे. विखेंच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. शिर्डी मतदारसंघात विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी केली जाते.

शिर्डी विधानसभा निवडणुकीत मराठा, माळी, धनगर हे जातीय समीकरण महत्त्वाचे ठरते. जरांगे पाटील यांच्या मराठा फॅक्टरने लोकसभा निवडणुकीत अनेकांच्या मतदारसंघात गणिते चुकवली. आता विधानसभेत हा फॅक्टर पुन्हा चर्चेत आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ही जाहीर न होणे आणि त्यापूर्वीच विखे यांनी हा मतदारसंघ पुन्हा पुन्हा पिंजून काढला आहे. विखे कुटुंबाचा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या मतदारांची संख्या मोठी आहे. विखे पाटील यांनी मतदारसंघात विकास कामांना दिलेला वेग आणि महायुती सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले निर्णय त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे यांना 1 लाख 32 हजार 316 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांना 45 हजार 292 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विशाल बबन कोळगे यांना 5788 मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे सिमोन ठकाजी जगताप यांना 1043 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार विश्वनाथ पांडुरंग वाघ यांना 683 मते मिळाली. नोटाला 1596 मते मिळाली. या निवडणुकीत 2 लाख 63 हजार 057 मतदार होते. एकूण वैध मतांची 1 लाख 86 हजार 718 होती. या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाले. त्यांना एकूण 1 लाख 32 हजार 316 मते मिळाली. राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश थोरात यांना 45 292 मते मिळाली. त्यांचा 87 हजार 24 मतांनी पराभव झाला. ना. विखे यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 70.86 टक्के इतकी होती तर सुरेश थोरात यांना 24.26 टक्के इतकी मते मिळाली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या