राहाता |वार्ताहर| Rahata
राहाता तालुक्यातील कोर्हाळे गावामध्ये 24 जून रोजी गणपत संभाजी कोळगे यांचा खून झाला होता. शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून वडिलांचा खून केल्यानंतर आरोपी अनिल कोळगे हा फरार झाला होता. पोलिस आरोपीचा शोध घेत असताना त्यांना शुक्रवारी अस्तगाव जवळ आरोपी असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ सापळा लावुन आरोपीस अटक केली आहे. शनिवारी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अनिल गणपत कोळगे हा गुन्हा केल्या पासून फरार होता.
शुक्रवार 28 जून रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान आरोपी हा अस्तगाव फाटा येथे येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाचे पोलीस विनोद गंभीरे यांना मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती पोलीस निरीक्षक सोपान काकड यांना सांगितली. पोलीस निरीक्षक काकड तात्काळ गुप्तचर विभागाचे पोलीस गंभीरे व शिंदे यांना सदर ठिकाणी पाठवले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी पकडण्यासाठी सापाळा लावला. एक व्यक्ती पायी चालत आल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांनी त्यास हटकताच तो पळू लागल्याने पोलीस पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले व त्यास पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाणेत आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी शिरीष वमने. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान काकड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कर्मचारी विशाल पंडोरे, श्रीकांत नरोडे, विनोद गंभीरे, संभाजी शिंदे यांनी केली आहे.