Wednesday, June 26, 2024
HomeनगरGram Panchayat Election Result : राहात्यात विखे गटाचा तर संगमनेरात थोरात पॅनेलचा...

Gram Panchayat Election Result : राहात्यात विखे गटाचा तर संगमनेरात थोरात पॅनेलचा डंका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी सायंकाळपर्यंत घोषित झाले. राहात्यात ना. विखे पाटील गटाने तर संगमनेरात आ. बाळासाहेब थोरात गटाने दणदणीत विजय मिळवून आपापले वर्चस्व कायम ठेवले आहे. श्रीरामपुरात ना. विखे, आ कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे आणि माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाला विविध ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे. नेवाशात गडाख गटाने अनेक ठिकाणी सत्ता अबाधित ठेवली. कोपरगावात आ. काळे गटाची सरशी झाली. राहुरीत 10 ठिकाणी भाजपा, 6 ठिकाणी राष्ट्रवादी तर 6 ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. अकोलेत बहुतांश ग्रामपंचायतचे निकाल धक्कादायक लागले असून अनेक ग्रामपंचायतीमधील सत्तारूढ गटाची सत्ता संपुष्टात आणत नवोदितांनी ‘हम भी किसीं से कम नही’ हे दाखवून दिले आहे.

दक्षिण जिल्ह्यात महायुतीची सरशी होताना दिसत असून पारनेर, शेवगावमध्ये राष्ट्रवादी तर पाथर्डी, नगर आणि कर्जतमध्ये भाजपने बाजी मारली. श्रीगोंदा तालुक्यात संमिश्र निकाल लागले आहेत.

राहाता-तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत 10 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी आपला विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे तालुक्यात मंत्री विखे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. राहाता तालुक्यात असणार्‍या परंतु कोपरगाव विधानसभा कार्यक्षेत्रात येणार्‍या पुणतांबाफ वाकडी व चितळी या ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाने बाजी मारत विरोधकांना पराभवाची धूळ चारली.

संगमनेर -तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व दिसून आले आहे. घारगाव व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाची सत्ता आली आहे. बोरबन ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर ढोलेवाडी मध्ये केवळ एक जागा राहिल्याने या ग्रामपंचायतीला निवडणूकीला सामोरे जावे लागले. प्रथमच ढोलेवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतरची ही निवडणूक बिनविरोध होता होता राहिली.

श्रीरामपूर-उक्कलगावात विखे गटाला बहुमत, मात्र आबासाहेब थोरात गटाकडे सरपंचपद आले आहे. उंदिरगावात मुरकुटे गटाला तर दत्तनगरमध्ये ससाणे गटाला सत्ता कायम ठेवण्यात यश आले आहे. माळवाडगावात आ. कानडे गटाची सत्ता, नाऊरमध्ये आ. कानडे, ससाणे आणि विखे गटाची सत्ता आली आहे.

नेवासा- तालुक्यामध्ये निवडणूक झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायती आमदार शंकरराव गडाख गटाने जिंकल्या आहेत. दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे तर पानसवाडी मध्ये स्व. तुकाराम गडाख यांना मानणार्‍या गटाने तर कौठा गावामध्ये अपक्ष सरपंच विजयी झाला आहे.

कोपरगाव-तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काळे गटाचा वरचष्मा पहावयास मिळाला. 17 पैकी 11 ग्रामपंचायतींच्या सरपंचदी काळे गटाचे उमेदवार विजय झाले. कोल्हे गटाचे तीन ठिकाणी तर कंभारी येथे अपक्ष सरपंचाने निवडणुकीत बाजी मारली. पोहेगाव ग्रामपंचायतीत औताडे-कोल्हे गटाच्या सरपंच झाल्या आहेत.तर जवळके ग्रामपंचायतीत जवरे- कोल्हे युतीच्या सरपंद झाल्या आहेत.

राहुरी- तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत 10 ठिकाणी भाजपा, 6 ठिकाणी राष्ट्रवादी तर 6 ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. काही ग्रामपंचायतीत सत्ताधार्‍यांनी आपला गड राखला तर काही ठिकाणी परिवर्तनाची त्सुनामी आल्याने सत्तांतर झाले. तसेच या निवडणुकीत काही प्रस्थापीतांना पराभवाला सामोरे जावे लागले. अकोले- तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतचे निकाल धक्कादायक लागले असून अनेक ग्रामपंचायतीमधील सत्तारूढ गटाची सत्ता संपुष्टात आणत नवोदितांनी ‘हम भी किसीं से कम नही’ हे दाखवून दिले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भाजपा, राष्ट्रवादी (अजितदादा गट), शरद पवार गट, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांनी दावा केला आहे. काही सरपंच पदाच्या विजयी उमेदवारांनी आपण अपक्ष असल्याचे विजयानंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

जिल्ह्यातील दक्षिण भागातील ग्रामपंचायतींच्या निकालावरून निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्याचा फारसा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर झालेला दिसत नाही. दरम्यान, काल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक ग्रामपंचायती भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गट, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गटाने ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहेत. पाथर्डीत भाजपच्या आ. राजळे, शेवगावमध्ये राष्ट्रवादीच्या घुले बंधू गटाने, पारनेर तालुक्यात आ. नीलेश लंके, कर्जत-जामखेडमध्ये आ. राम शिंदे यांच्या गटांनी अधिक ग्रामपंचायती राखल्या. तर श्रीगोंद्यात सर्व गटांना संमिश्र विजय मिळाल्याचे चित्र आहे.

पाथर्डी तालुक्यात 15 पैकी 12 ग्रामपंचायतींवर भाजपच्या आ. मोनिका राजळे यांच्या गटाने वर्चस्व राखले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 2 तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाने 1 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळावले आहे. शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या घुले, बंधू आणि प्रताप ढाकणे गटाने 27 पैकी 17 जागांवर विजय मिळवले आहेत. तर भाजप 3, जनशक्तीच्या काकडे यांच्या जनशक्ती विकास आघाडीने 3, मनसे 1 व स्थानिक आघाडीने 3 ग्रामपंचायत मिळवल्या आहेत. पारनेर तालुक्यात 7 पैकी 6 ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच अजित पवार गटाच्या आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वातील गटांनी विजय मिळवले आहेत. तर मनसे ने 1 ग्रामपंचायतीवर विजय साकार केला. कर्जत तालुक्यात 6 पैकी 3 ग्रामपंचायतींवर भाजपचे आ. राम शिंदे यांच्या गटांनी दावा केला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2 तर 1 ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडी विजयी झाली आहे. श्रीगोंद्यात 10 पैकी भाजप आ. बबनराव पाचपुते गटाला 3, राष्ट्रवादीचे माजी आ. राहुल जगताप 3 तर काँग्रेसचे राजेंद्र नागवडे यांच्या गटाला 2, तसेच अजित पवार गटासोबत असणारे बाळासाहेब नहाटा 1 व इतर 1 अशी सरपंचपदे मिळाल्याने जनतेने संमिश्र कौल दिला आहे. जामखेड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीत चांगली टक्कर झाली.

वाढती महागाई, बेरोजगारी, शेत पिकांच्या भावाचा प्रश्न यासह अन्य अनेक मुद्द्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न ताजा असतांना त्याचा फारसा परिणाम दक्षिणेतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर झालेला दिसत नाही. या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपआपे गड राखण्यात यश मिळले आहे. वास्तवात ग्रामपंचायत निवडणूक ही वेगळी निवडणूक असून त्यात स्थानिक प्रश्नांवर लढली जात असते. यामुळे नगर दक्षिणेतील ग्रामपंचायतींचा निकालावर कोणत्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी हुरळून जावू नयेत, असे राजकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या