राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत राहाता बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील 596 शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या 12 हजार 44 क्विंटल सोयाबीनला 5 कोटी 29 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने आधारभूत किंमतीने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी बाजार समितीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोयबीन केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रात 18 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सोयाबीन खरेदी करण्याचा कालावधी ठेवण्यात आला होता.
मात्र शेतकर्यांकडे सोयाबीनचे उत्पादन अधिक असल्याने केंद्राला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकाकडे पाठपुरावा करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. सोयाबीन खरेदीसाठी 6 जानेवारी 2025 पर्यंत मिळालेल्या मुदतवाढीचा शेतकर्यांना मोठा फायदा झाला. तालुक्यातील 596 शेतकर्यांनी बाजार समितीच्या केंद्रात 12 हजार 44 क्विंटल सोयाबीन विक्री केली. सरकारने ठरवून दिलेल्या 4 हजार 892 रुपये आधारभूत किंमतीप्रमाणे शेतकर्यांच्या खात्यात 5 कोटी 89 लाख रुपये जमा झाले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या मदतीसाठी बाजार समितीने खरेदी केंद्राची उभारणी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली होती. केंद्रावर सुयोग्य नियोजन झाल्यामुळे शेतकर्यांना सोयाबीन विक्री करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाने प्रयत्न केले होते.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळत आहे. किसान सन्मान योजनेचा निधी शेतकर्यांच्या खात्यात वर्ग झाला असून केंद्र सरकार प्रमाणेच राज्यातील महायुती सरकारने नमो किसान सन्मान योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे अनुदान वाढवून देण्याची घोषणाही करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.