Saturday, September 19, 2026
Homeनगरवीरभद्र महाराज यात्रेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या पिडीतेच्या भावांना टोळक्याकडून बेदम...

वीरभद्र महाराज यात्रेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या पिडीतेच्या भावांना टोळक्याकडून बेदम मारहाण

राहाता (वार्ताहर)

राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्या यात्रोत्सवात एका अल्पवयीन मुलीची छेड काढून, तिच्या भावांना जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांनी मुख्य चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३ एप्रिल रोजी पीडित मुलगी तिच्या पाच भावांसह वीरभद्र महाराज यात्रेसाठी आली होती. रात्री १० वाजेच्या सुमारास यात्रा फिरून झाल्यानंतर सर्वजण मंदिराजवळील जगदाळे वडापाव केंद्राकडे जात होते. यावेळी आरोपी शंकर किशोर कुऱ्हाडे याने पीडितेसमोर येऊन अश्लील हावभाव केले. त्याने पीडितेच्या पाठीवरून हात फिरवून चल वडा खायला असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

जेव्हा पीडितेच्या भावांनी या कृत्याचा जाब विचारला, तेव्हा त्याचा राग मनात धरून आरोपी शंकर किशोर कुऱ्हाडे, रोहित राजेंद्र डुकरे, साहिल विजय कुऱ्हाडे आणि आदेश साहेबराव माळी यांनी आपल्या इतर १० ते १५ अज्ञात साथीदारांना गोळा केले. या टोळक्याने शनी मंदिर कमानीजवळ पीडितेच्या भावांना गाठले आणि आमच्या नातेवाईकांना कोणी मारले? असा उलट सवाल करत लाथाबुक्क्‌यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, अत्यंत घाणेरडी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, १८९ (२), १९१ (२) (३), ११५ (२), ३५२, ३५१ (२) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ८, १२ प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ११५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत शंकर किशोर कुऱ्हाडे, रोहित राजेंद्र डुकरे, साहिल विजय कुऱ्हाडे आणि आदेश साहेबराव माळी या चौघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस स्टेशनसमोर आरोपींच्या समर्थकांचा मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी विनंती करूनही जमाव हटत नसल्याने अखेर सौम्य लाठीमार करावा लागला, त्यानंतर जमाव पांगला.

या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत यांच्याकडे आहे. मात्र शनिवारी दुपारी पत्रकारांनी घटनेची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. लपवत एका बाजूला मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना पोलीस माहिती असल्याने कुमावत यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fraud Crime : फाइन सिक्युरिटीजचा भंपकपणा; सेवानिवृत्तास फसवून ८६ लाख...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik आयुष्यभराची पुंजी सुरक्षित राहावी आणि पेन्शनच्या पैशांवर चांगला परतावा मिळावा या आशेने एफडी (फिक्स डिपॉझिट) (Fine Securities) करू पाहणाऱ्या एका...