Friday, November 22, 2024
Homeनगरराहाता नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम

राहाता नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दीड कोटीचे बक्षीस

राहाता |वार्ताहर| Rahata

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राहाता नगरपरिषदेला नाशिक विभागात प्रथम तर राज्यात पाचवे क्रमांकाचे दीड कोटीचे पारितोषिक प्रथमच मिळाल्याने राहाता नगरपरिषदेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सन 2023-24 माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यात ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिकांना भूमी, वायू ,जल, अग्नी व आकाश या पंचतत्त्वावर केलेली कामे याकरिता प्रत्येक वर्षी शासनाकडून पुरस्कार देण्यात येतो.

- Advertisement -

प्रांताधिकारी तथा प्रशासक माणिक आहेर व मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी नगरपरिषदेच्या सर्वच विभागातील कर्मचार्‍यांना पारितोषिक मिळण्याकरिता चांगल्या प्रकारची मेहनत घ्यावी यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. कर्मचार्‍यांनी देखील यासाठी चांगली मेहनत घेतली. शहरात वृक्षारोपण मोहीम, आरोग्य विषयी जनजागृती, स्वच्छता अभियान, ओला व सुका कचरा वर्गीकृत करणे, वायु प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना, इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन निर्मिती, विहीर व तलाव यांचे पुनर्भरण करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जल प्रदूषण कमी करणे, सोलर पॅनल बसविणे, शहरात एलईडी पथदिवे बसविणे, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेचे आयोजन, पर्यावरण बाबत शाळा व महाविद्यालयात जनजागृती अभियान राबवणे अशा विविध उपाययोजना शहरात राबवून या योजनेची उत्कृष्ट प्रकारे अंमलबजावणी नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी सातत्याने केली आहे. नगरपरिषदेला हे बक्षीस मिळण्याकरिता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन आहे.

महसूल मंत्री विखे पाटील यांनी शहरात तसेच जंगल प्रभागात विविध रस्त्यांचे सशोभीकरण व शहराच्या विकास कामांसाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे एकेकाळी टपरीचे शहर म्हणून ओळख असणारे राहाता शहर आता मॉडेल सिटी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी व्यवसायिकांना नगरपरिषदेच्या माध्यमातून शेकडो गाळ्यांची निर्मिती करून बेरोजगार रोजगार उपलब्ध करून दिला. स्वच्छ व सुंदर शहर दिसण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून विविध विकास योजना अंमलात आणल्या त्यामुळे हे पारितोषिक मिळण्यासाठी त्यांचा देखील मोलाचा सहभाग आहे. साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे व त्यांच्या सहकार्‍यांनी शहरात हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे शहर आज हिरवळीने नटले त्यांचे देखील यात चांगला सहभाग आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगरपरिषद कर्मचारी, शहरातील विविध सामाजिक संघटना व शहरातील ग्रामस्थ सर्वांच्या पुढाकाराने राहाता नगरपरिषदेला प्रथमच नाशिक विभागात प्रथम व राज्यात पाचवे दीड कोटीचे पारितोषिक मिळाल्याने राहाता नगरपरिषदेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राहाता नगरपरिषदेला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नाशिक विभागात प्रथम तर राज्यात पाचवे क्रमांकाचे पारितोषिक मिळाले त्याबद्दल नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ यांचे विशेष अभिनंदन. प्रशासक माणिक आहेर,जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, नगर विकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे राहाता नगरपरिषदेला हे बक्षीस मिळाले. यापुढे नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याकरिता आम्ही सर्व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी चांगली मेहनत घेऊ.
– वैभव लोंढे, मुख्याधिकारी, राहाता

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या