राहाता |वार्ताहर| Rahata
राहाता नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी नगरपरिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. नवीन प्रारूप आराखड्याप्रमाणे प्रभाग संख्या दहा झाली आहे तर पूर्वीच्या तुलनेत दोन प्रभाग आणि तीन सदस्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता नगरसेवक सदस्यांची संख्या 17 ऐवजी 20 झाली आहे. परंतु नवीन प्रभाग रचनेमुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ही प्रारूप प्रभाग रचना काहींसाठी फिलगूड तर काहींना डोकेदुखी ठरली आहे.
इतिहासात प्रथमच सलग पाच वर्ष प्रशासक म्हणून नगरपरिषदेचे कामकाज मुख्याधिकारी यांनी पाहिले आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषदेमध्ये पाच वर्ष प्रशासक राज बघायला मिळाले. अखेर अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुक नगरसेवकांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला. आगामी निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेनुसार शहराची एकूण लोकसंख्या 22,358 इतकी ग्राह्य धरण्यात आली आहे. गुगल अर्थ किंवा तत्सम संगणीकृत नकाशाच्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन प्रभाग रचनेमुळे राहाता शहरात नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये काहीसे आनंदी तर काहीसे नाराजी चे वातावरण दिसून आले. दहा प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यायचे असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी ही प्रभाग रचना सोपी झाल्याचे तर काहींनी अडचण झाल्याचे बोलून दाखवले.
प्रभाग क्रमांक 1 ची लोकसंख्या 2001 असून प्रभागाची व्याप्ती बनमंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, घनकचरा प्रकल्प, बोरीचा मळा, जगन्नाथ सदाफळ वस्ती आणि सोपान भागूजी सदाफळ यांच्या वस्तीपर्यंत आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, मारुती गिधाड वस्ती, बोठे क्लास, विनायक दंडवते वस्ती, शनी मंदिर, सदाफळ क्लास, यशवंत जानबा मेहत्रे, मेचे आणि अनिल बोठे यांची वस्ती तसेच 14 चारी पर्यंत समाविष्ट आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये नारायण लांडगे, चितळकर घर, संजय सदाफळ, आरणे, गिरमे, झिंजाड, टिळेकर वस्ती, रानविरोबा मंदिर, 15 चारी जिल्हा परिषद शाळा, दगडू सदाफळ, लांडगे, बनसोडे, ज्ञानेश्वर कार्ले आणि किरण गायकवाड यांच्यासह पवन नगरपर्यंत आहे.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये अण्णाभाऊ साठे नगर, आंबेडकर नगर, गौतमनगर, हॉटेल राजयोग, हत्तीनाला, रांजणगाव रोड, स्वप्निल गाडेकर, कोहिनूर लॉन्स, साईनगर, भोंगळे वस्ती, इकबाल कालुबाई, अस्तगाव रोड आणि अंबिका नगरपरिसर ते गणपत नाला पर्यंत आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये खंडोबा चौक, संत सेना व सावता महाराज मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, गाडेकर शाळा, जनावरांचा दवाखाना, पेंटर माळवडे, छत्रपती संभाजी महाराज चौक, एकलव्य नगर आणि नगरपरिषद व्यापारी संकुल चितळी रोड पर्यंत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये खंडोबा मंदिर, तारगे घर, डॉ. शेख, देवारे घर, गणपती मंदिर, बोराडे सोनार, ऋषिकेश पाठक, अग्रवाल, धाडीवाल, किसन मोरे दुकान, भारत सायकल, अग्रवाल मेडिकल, 340 सर्वे नंबर, ताम्हाणे मळा, कालिका व मेहेत्रेनगर व द्वारकानाथ बोठे घरापर्यंत.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये राबियानगर, साईनगर, नगरपरिषद कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले व्यापारी संकुल, मारुती मंदिर, हिंगे वाडा, सदाफळ चावडी, गणेश किराणा, सोमवंशी फ्लोअर मिल, संजय देव्हारे घर, पृथ्वी शॉपी सेंटर, सौभाग्य वस्त्र भांडार पर्यंत. प्रभाग क्रमांक 8- छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा परिषद शाळा, विशालनगर, गुरुनानक गल्ली, डॉ. कांकरिया, वायदंडे, घोलप मंगल कार्यालय, पिंपळाचा मळा, नवनाथनगर, जेजुरकर, शेळके घर, सुरेश पिक्चर पॅलेस, कुंदन सुपर मार्केट परिसर. प्रभाग क्रमांक 9- पोलीस स्टेशन, नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र, त्रिशूल नगर, रायसोनी, राजगुरू, मच्छिंद्र बनकर वस्ती, सोनवणे निवास, बसस्टँड, लोकरूचिनगर, बांगडे वस्ती, ग्रामीण रुग्णालय, कानडे हॉस्पिटल, गायकवाड व सोनुले घर. प्रभाग क्रमांक 10- बागडे, गलांडे वस्ती, निंबोणीचा मळा, पैंजण बाबा मळा, ताटे, पुंड व निवृत्ती गाडेकर वस्ती, हरी बाबा आडाचा व चिंचेचा मळा, शिंदे वस्ती, स्टेट बँक, आपला बाजार व राक्षे मळा. अशा या नवीन झालेल्या प्रारूप 10 प्रभाग रचनेची सीमारेषा आराखडा तयार करण्यात आला असून सदर प्रारूप प्रभाग रचना नगरपरिषद कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांना सदर नवीन प्रारूप नवीन रचना आराखड्यासाठी सूचना किंवा हरकती घ्यायच्या असतील त्यांनी दि. 18 ते 31 ऑगस्टपर्यंत नगरपरिषद कार्यालयात लेखी स्वरूपात अर्ज करावेत, अशी माहिती मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी दिली.
नवीन प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर झाला असला तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षणाची सोडत निघाल्यानंतरच खर्या अर्थाने नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रंगत येणार असून आरक्षण काय निघेल यावर सर्व राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.





