Saturday, July 27, 2024
Homeनगरबकर्‍या वाटपाच्या कारणावरून सख्ख्या भावाने केला भावाचा खून

बकर्‍या वाटपाच्या कारणावरून सख्ख्या भावाने केला भावाचा खून

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बकर्‍या वाटपावरुन झालेल्या जोरदार भांडणातून तालुक्यातील शिंगवे येथे सख्ख्या भावाने दुसर्‍या भावाचा खून केला आहे. ही घटना काल सायंकाळी 4 वाजता घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे. जालिंदर रमेश मोरे असे मयताचे नाव आहे.

- Advertisement -

मयत जालिंदर रमेश मोरे व त्याचा भाऊ महेंद्र रमेश मोरे यांना दारुचे व्यसन होते. त्यांच्या आई वडिलांच्या 24-25 बकर्‍या आहेत. त्या बकर्‍यांच्या वाटणीवरून दोघांचे सतत भांडण होत असे. चार महिन्यांपुर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यात मयत जालिंदर याने महेंद्र यास जास्त मारहाण केली होती. त्यात महेंद्रचा पाय मोडला होता. तसेच दोघेही वारंवार आई-वडिलांकडे पैसे मागून आईवडिलांना मारहाण करीत असत.

काल सायंकाळी यातील फिर्यादी राजेंद्र बाबुराव मोरे यास सायंकाळी 4 वाजता गावात राहाणारे काबा हरिभाऊ पगारे यांनी सांगितले की, गावठाण जागेत असेलेले नवीन लक्ष्मीआईचे मंदिरासमोर तुझा चुलत भाऊ जालिंदर याचा मर्डर झालेला आहे. असे कळविल्याने फिर्यादीने त्याचा मित्र योगेश पगारे हा फिर्यादी सोबत येऊन सदर ठिकाणी गेले. त्यावेळी जालिंदर रमेश मोरे (वय 22) याच्या गळ्यावर कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यास जागीच ठार मारल्याचे निदर्शनास आले.

मयत जालिंदर रमेश मोरे व त्याचा मोठा भाऊ महेंद्र रमेश मोरे यांनी काल सकाळी बकर्‍याच्या वाटणीवरून त्यांच्या आई वडीलांशी भांडणे करुन दोघेही दारू पिऊन दुपारपासून लक्ष्मीआई मंदिरासमोर आपआपसात जोरजोराने भांडण करीत होते. त्या भांडणातूनच जालिंदर मोरे याला महेंद्र रमेश मोरे याने कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करुन त्यात जागीच ठार मारले आहे,

याप्रकरणी मयताचे चुलत भाऊ राजेंद्र बाबुराव मोरे (रा. शिंगवे) यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी महेंद्र रमेश मोरे याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राहाता पोलिसांनी गुन्हा रजि. नंबर फस्ट 35/22 भादंवि कलम 302 प्रमाणे आरोपी याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज घेतलेले साई मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या