राहाता (तालुका प्रतिनिधी)- अकार्यक्षम, बेजबाबदार व दप्तर दिरंगाईचा ठपका ठेवत तसेच फॉगींग मशीन डिझेल व पेट्रोल अपहार होत असताना दुर्लक्ष केले. राहाता पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विजयकुमार आवारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन कंपनीमार्फत होत असलेल्या स्वच्छतेच्या कामावर लक्ष न दिल्याने पालिकेचे 39 लाखांचे नुकसान झाले आदी बाबींचा ठपका ठेवत प्रभारी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी ही कारवाई केली.
राहाता पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख म्हणून विजयकुमार आवारे काम पाहात असून त्यांचे पालिकेच्या आरोग्य विभागावर कोणतेही नियंत्रण नाही. शहरातील फॉगींग महालक्ष्मी ट्रेडींग कंपनी जळगाव यांच्यामार्फत करण्यात आले. फॉगींग कामी देण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलमध्ये अपहार झाल्याचे निप्षन्न झाले. शहरातील घनकचरा व्यवस्थापनकरिता भाग्येश हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. ही कंपनी स्वच्छतेचे काम करत होती. या कामावर आवारे यांचे नियंत्रण व पर्यवेक्षण नव्हते. तसेच ठेकेदाराने बिल अदा करणेकरिता दिलेली मोजमापे याची पडताळणीही आवारे यांनी केलेली नाही.
तसेच सदरची मापे नोंदवहीत न लिहिता बिले अदा केली. त्यामुळे पालिकेचे 39 लाखांचे नुकसान होऊन सार्वजनिक पैशाचा अपव्यय झाला आहे. शहरातील नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा न करणे, कार्यालयीन रेकॉर्ड न बनविणे, त्याची व्यवस्था न ठेवणे, कामावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवेहलना करणे, कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे या गंभीर प्रकरणी ठपका ठेऊन विजयकुमार आवारे यास 26 डिसेंबर 2019 पासून निलंबीत करण्यात येत असून आपली 27 डिसेंबरपासून विभागीय चौकशी सुरू करण्यात येत आहे. चौकशी अधिकारी म्हणून दीपक अग्रवाल यांची नियुक्ती केली असल्याचे आदेशात मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी म्हटले आहे.