राहाता |वार्ताहर| Rahata
राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राहाता शहरासह परिसरातील 19 गावांमध्ये भुरट्या चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक पूर्णपणे संपल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. शेती अवजारे, पशुधन आणि दुचाकींच्या चोरीच्या घटनांनी शेतकरी हवालदिल झाला असतानाच, दुसरीकडे छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा, दारू आणि मटक्याच्या व्यवसायांनी तरुण पिढी बरबाद होत आहे. मात्र पोलीस प्रशासन या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप आता नागरिक उघडपणे करू लागले आहेत.
राहाता, साकुरी, पुणतांबा, काकडी, पिंपळस यासारख्या प्रमुख गावांमध्ये गेल्या काही दिवसात चोरीच्या सत्राने उच्चांक गाठला आहे. शेतकर्यांच्या विहिरींवरील महागडे कृषी पंप, गोठ्यातील शेळ्या-बोकड आणि रस्त्यावरून दुचाकी लंपास होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे आठवडे बाजारात येणार्या सामान्य नागरिकांचे मोबाईल आणि खिसे कापण्याचे धाडस आता गुन्हेगारांमध्ये वाढले आहे. या संतापजनक परिस्थितीत जेव्हा त्रस्त नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जातात, तेव्हा त्यांना मिळणारी वागणूक अत्यंत संतापजनक आहे. साहेब नाहीत, नंतर या किंवा साहेब आल्यावर बघू अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रारदारांनाच अपमानित करून माघारी धाडले जात आहे. पोलिसांच्या या ‘टाळाटाळ’ धोरणामुळे गुन्हेगारांचे मनोबल अधिकच उंचावले आहे.
शहरातील सुरक्षिततेसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वखर्चाने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आज नगरपरिषद आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे निकामी झाले आहेत. याचाच फायदा घेऊन रात्रीच्या वेळी रोडरोमिओ आणि कर्कश सायलेन्सर लावलेल्या दुचाकीस्वारांनी शहराची शांतता भंग केली आहे. महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड काढण्याचे प्रकारही वाढले असून पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. या संपूर्ण अनागोंदी कारभारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून राहाता पोलीस ठाण्यातील सुस्त कारभाराला चाप लावावा आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.




