Sunday, September 8, 2024
Homeनगरआढावा बैठकीला उशिरा आलेले प्रांत व तहसीलदारांना खा. लोखंडे यांनी खडसावले

आढावा बैठकीला उशिरा आलेले प्रांत व तहसीलदारांना खा. लोखंडे यांनी खडसावले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल मंगळवारी खासदार सदाशिव लोखंडे हे राहाता प्रशासकीय कार्यालयात 11 वाजता हजर झाले. परंतु आधी सूचना देऊनही या कार्यालयात राहाता तहसीलदार व प्रांताधिकारी हजर झाले नाहीत! त्यामुळे खासदार लोखंडे यांनी त्यांना फोन करून जनतेच्या कामासाठी तुम्हाला वेळ नाही का? असा सवाल करत जाब विचारला. त्यानंतर काही वेळाने अधिकारी कार्यालयात उपस्थित झाले.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील शासकीय योजनांचा आढावा, शासन आपल्या दारी कामकाज या कामकाजासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सर्व अधिकारी यांची बैठक काल राहाता येथील प्रशासकिय इमारतीतील खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सभागृहात बोलावली होती. परंतु अधिकारी लवकर हजर न झाल्याने खासदार लोखंडे नाराज झाले. त्यांनी अधिकार्‍यांची चांगलीच हजेरी घेतली.

नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, अन्न सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान कार्ड, माझी कन्या योजना, पाठ्यपुस्तक वितरण, गणवेश वितरण यांसह अनेक योजनांच्या कामाचा आढावा खासदार लोखंडे यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी अधिकारी चांगले काम करत असल्याचा अभिप्राय उपस्थित नागरिकांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी हे अभियान सुरू केले. परंतु प्रत्यक्ष अधिकारी नागरिकांचे कामकाज करतात की नाही, याची शहानिशा खासदार लोखंडे यांनी केली. निस्वार्थीपणे सर्वसामान्य जनतेची कामे करा, या बैठकीत दिलेले कामकाज होते की, नाही याविषयी पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल, असे खा लोखंडे यांनी सांगितले. यावेळी बैठकीसाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, भाजपाचे नेते नितीनराव कापसे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष निलेश कोते, शिवसेना वैद्यकीय कक्षप्रमुख जितेंद्र जाधव, विजय काळे, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, विलास गुळवे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते .

राहाता तालुका आरोग्य अधिकारी संजय घोलप यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल खा.लोखंडे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला! घोलप यांनी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच 30 आरोग्य वर्धनी केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन खा. लोखंडे यांनी आढावा बैठकीत विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिल्यामुळे त्यांचा सत्कार केला. तसेच ज्या अधिकार्‍यांनी नागरिकांचे व्यवस्थित कामकाज केले नाही, अशा अधिकार्‍यांना महिन्यात सर्व प्रश्न सोडविण्याची ताकीद दिली. रेशन दुकानदार पूर्ण वेळ रेशन वाटपासाठी देत नाही, काहींना धान्य कमी दिले जाते, काहींना धान्य सुरू करण्यात आले नाही, अशा तक्रारी आल्या आहेत, अशा दुकानदारांना निलंबनाचे आदेश खासदार लोखंडे यांनी दिले.

पुरवठा विभागाच्या अधिकार्‍याला शिधापत्रिकासाठी किती अर्ज आले याविषयी माहिती विचारली असता या अधिकार्‍याने चुकीची माहिती दिली, त्यामुळे अधिकार्‍याला खा. लोखंडे यांनी चांगलेच झापले. मला जनतेविषयी चांगलीच जाणीव आहे, एवढे कमी अर्ज येतील का? का गावोगावी जाऊन जनतेला विचारणा करू, जनतेच्या समस्या जर मला समजत नसेल तर राजकारण सोडील असे खा सदाशिव लोखंडे चालू बैठकीत म्हणाले .

- Advertisment -

ताज्या बातम्या