Tuesday, September 17, 2024
Homeनगरराहाता तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत

राहाता तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत

राहाता | Rahata

- Advertisement -

शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी देखील राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश विना शाळेत जावे लागत असून जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत पालकांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहे. 15 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी शाळेची घंटा वाजली. जिल्हा परिषद शाळेत जाणारे बहुदा विद्यार्थी हे सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बूट व दररोज पोषण आहार देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

मागील वर्षापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व बूट देण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांची होती. तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी दिला जात होता. काही कारणास्तव शिक्षकांकडून गणवेश देण्यासाठी एक दिवस जरी उशीर झाला तर लगेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जायची. यावर्षी शाळा सुरू होऊन एक महिना झाला असताना देखील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाला नाही याला जबाबदार कोण? गणवेश देण्यास उशीर झाल्याबद्दल राज्य शासन आता कोणावर कारवाई करणार असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात विविध तालुक्यात विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे काम सुरू आहे मात्र राहाता तालुक्यात अद्याप कुठल्याही जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले नाही. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासूनच इतर शाळेतील विद्यार्थी गणवेशात शाळेत जातात, परंतु अद्याप आपल्याला गणवेश नाही हे पाहून जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शाळेत सूट-बूटमध्ये जावे याची उत्कंठा असते. मात्र राज्य शासन शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी अद्याप गणेश मिळाले नाही. त्यामुळे गणवेश मिळणार कधी याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांबरोबर पालकांना देखील लागली आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने राहाता तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी कापड खरेदी करून महिला बचत गटाकडे शिवण्यासाठी दिले आहे. कापड शिवण्यासाठी गेल्यानंतर 45 दिवसांनी ते मिळणार असल्यामुळे पुढील आठवड्यापासून राहाता तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यास सुरुवात होईल.
राजेश पावशे, गटशिक्षण अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या