Monday, September 14, 2026
HomeनगरRahata : राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

Rahata : राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रशासकीय अडचणींमुळे घेता न आल्याने या ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून 8 सप्टेंबर रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे 25 ग्रामपंचायतींचा कारभार 12 शासकीय अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर सुरुवातीला संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकार्‍यांकडे प्रशासक म्हणून सोपविण्यात आला. मात्र या नियुक्तीला सरपंच परिषदेने हरकत घेतल्यानंतर शासनाने परिपत्रक काढून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर संबंधित सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. शासनाच्या या निर्णयालाही काही ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल करून हरकत घेतली. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने सरपंचांना प्रशासक म्हणून कायम ठेवण्यास हिरवा कंदील दिला. मात्र प्रशासक म्हणून काम करताना त्यांच्या खर्चाच्या अधिकारांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे प्रशासक म्हणून जबाबदारी असतानाही ग्रामपंचायतीच्या विकास कामांसह अन्य बाबींवर खर्च करता येत नसल्याने अनेक गावांमधील प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला.

प्रशासकांना खर्चाचे अधिकार मिळावेत यासाठी न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र प्रशासक नियुक्तीचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर शासनाने या संपूर्ण प्रकरणाचा पुनर्विचार केला. त्यानंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींवर 12 अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 151 च्या पोटकलम (1) मधील खंड (अ) च्या परंतुकानुसार, प्रशासकीय अडचणींमुळे ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे शक्य नसल्यास प्रशासक नियुक्त करण्याची तरतूद आहे. शासनाने या अधिकारांचे प्रत्यायोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना केले आहे.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींसाठी प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले आहेत. ही नियुक्ती 8 सप्टेंबर पासून सहा महिन्यांसाठी किंवा संबंधित ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन ग्रामपंचायत स्थापन होईपर्यंत राहणार आहे. यापैकी जे अगोदर घडेल, त्यावेळी प्रशासकांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. नियुक्त प्रशासकांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, त्याखालील नियम, संबंधित कायदे तंसेच शासन आदेशांनुसार ग्रामपंचायतींचे कामकाज पाहावे लागणार आहे.

ग्रामपंचायतीनुसार नियुक्त प्रशासक ः आडगाव बुद्रुक, केलवड, बाभळेश्वर – के. डी. आरगडे, विस्तार अधिकारी कृषी. अस्तगाव. कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर – बी. के. गागरे, विस्तार अधिकारी (पं.). एकरुखे, रामपूरवाडी – रामदास गंभिरे, विस्तार अधिकारी (सां.). हणमंतगाव, पाथरे बुद्रुक, चंद्रापूर – अक्षय नायकू, विस्तार अधिकारी (सां.). हसनापूर, पिंपरी लोकाई – जयश्री जाधव, विस्तार अधिकारी कृषी. वाळकी – चंद्रशेखर लांडगे, शाखा अभियंता. जळगाव – बी. आर. फटांगरे, विस्तार अधिकारी (आरोग्य). लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, गोगलगाव – सुनील माळी, विस्तार अधिकारी (पं.). ममदापूर, नांदूर – मयुर मुनोत, शाखा अभियंता. तिसगाव, रांजणगाव खुर्द – प्रदीप जगताप, शाखा अभियंता. पिंपळवाडी, सावळीविहीर खुर्द – नानासाहेब वाघमारे, शाखा अभियंता. शिंगवे – विनोद भिसे, विस्तार अधिकारी (आरोग्य).

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या धरणातून 3147 क्युसेकने विसर्ग...