Wednesday, May 29, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 47 हजार विमा प्रस्ताव

राहाता तालुक्यात 47 हजार विमा प्रस्ताव

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्यातील शेतकर्‍यांचा पीक विमा भरण्यासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारने जबाबदारी घेतली. सरकारच्या या योजनेतून एक रुपयामध्ये शेतकर्‍यांना आपल्या शेतातील उभ्या खरीप पिकाचा विमा उतरवता आला आहे. यात राहाता तालुक्यात तब्बल 30 हजार शेतकर्‍यांनी विक्रमी सहभाग घेतला असून 46 हजार बिगर कर्जदार आणि 784 कर्जदार असे 46 हजार 784 विम्याचे प्रस्ताव दाखल केले आहेत. गेल्या काही वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वात जास्त विक्रमी संख्येने पिक विमाधारक शेतकरी वाढले आहेत.

- Advertisement -

राज्यातील शिंदे, फडणीस व पवार सरकारने यावर्षी पहिल्यांदाच एक रुपयात पीक विमा भरून घेण्याची योजना सुरू केली आहे. तसेच पावसाचे प्रमाणही कमी असल्याने विमा योजनेत सहभागी झाल्यास खरीपाचे उत्पन्न घटल्यास किंंवा नुकसान झाल्यास परतावे निश्चीत मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे चालू वर्षी बहुतांशी शेतकर्‍यांनी पीक विमा भरण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते आहे. तालुक्यातील पाच महसुल मंडळांमध्ये सर्वाधीक राहाता मंडळात 7 हजार 851 शेतकर्‍यांनी 12 हजार 250 पीक विम्याचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्याखालोखाल पुणतांबा 7 हजार 583 शेतकर्‍यांचे 11 अर्ज 550 प्रस्ताव, लोणी 6 हजार 270 शेतकर्‍यांचे 9 हजार 867 प्रस्ताव, बाभळेश्वर मंडळात 5 हजार 349 शेतकर्‍यांचे 7 हजार 629 प्रस्ताव व शिर्डी मंडळात 3 हजार 496 शेतकर्‍यांनी 5 हजार 449 पिक विमा भरण्याचे प्रस्ताव दाखल केले आहेत.

गेल्या वर्षी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुरावामुळे अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात खरीप पीक विम्याचे परतावे मिळाले होते. यावर्षीही पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाचा खंड व ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणारी संभावित अतिवृष्टी याचा फटका खरीप पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामळे जवळपास मोफतच असलेल्या पिकविमा योजनेत सहभाग घेतल्यास चालु वर्षी चांगले विमा परतावे मिळतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.

चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नुकसान होवू शकते. असे झाल्यास शेतकर्‍यांना विम्याच्या रूपाने हक्काचा आधार मिळावा यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कृषी व महसुल यंत्रणेचा समन्वय साधून एका रुपयात पिक विमा योजना सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यत पोहचविली. त्यामुळे यावर्षी राहाता तालुक्यात योजनेतील लाभार्थ्यांचा सहभाग विक्रमी दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या