Tuesday, May 28, 2024
Homeनगरपावसाने मारली दडी अन् बिबट्याने बिघडविली घडी

पावसाने मारली दडी अन् बिबट्याने बिघडविली घडी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील दहेगाव, साकुरी परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने या परिसरातील शेतकरी वैतागले आहेत. पावसाने मारली दडी अन बिबट्याने बिघडविली घडी, अशी अवस्था दहेगाव भागातील शेतकर्‍यांची झाली आहे.

- Advertisement -

दहेगाव तसेच साकुरी तसेच अन्य भागातही बिबट्या ठिकठिकाणी नजरेस पडत आहे. या बिबट्या सोबत दोन बछडेही आहेत. परिणामी शेतकरी रात्री शेतात पाणी भरण्यास धजावत नाही. एक तर निसर्ग कोपला असतानाच हे कृत्रिम संकट शेतकर्‍यांच्या दारी ठाकले आहे. पावसाअभावी पिके जळून चालली आहेत. भर दुपारी उन्हाच्या चटक्यात पिकांकडे बघू वाटत नाही. जेथे पिकांना विहिरीच्या मार्फत पाणी देण्याची सुविधा आहे, तेथे कधी रात्रीची तर कधी दिवसाची वीज असते. रात्रीची वीज असेल तर वीजपंप चालू करून शेताला पाणी देण्यास शेतकरी बिबट्याच्या भितीने धजावत नाही. परिणामी पिकांना मोठा फटका बसत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस नाही. अल्प पावसावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत. त्याची उगवणही चांगली झाली आहे. परंतु पावसाअभावी आलेले पीक जळून जाण्याच्या तयारीत आहे. दहेगाव भागातील शेतकर्‍यांना उभ्या पिकांना पाण्याची इच्छा आहे, परंतु बिबट्याच्या भितीने पिके जळून चालली आहेत, अशी व्यथा भगवानराव डांगे यांनी मांडली. वनविभागाने या बिबट्यांचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी श्री. डांगे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या