राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यात रब्बीच्या 70 टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र काही गावात रब्बीच्या पेरण्यांसाठी वापसा नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. या आठवडाभरात सर्वत्र पेरण्या होतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी दिली.
राहाता तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. मात्र रब्बीचे पीक चांगले येईल या अपेक्षेवर शेतकरी आहेत.
रब्बीच्या पेरण्या काही भागात झाल्या आहेत. तर काही भागात अद्यापी जमिनीला ओलसरपणा असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. रब्बी ज्वारीच्या 23.5 टक्के पेरणी झाली आहे. 1414 हेक्टरवर सरासरी नियोजन असते. पुर्वी 6743 हेक्टरवर हे नियोजन होते. मात्र ज्वारीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. तालुक्यातील पुणतांबा, रामपूरवाडी, पिंपळवाडी, कोर्हाळे, वाळकी आदी भागात रब्बीच्या ज्वारीची पेरणी होते.
तालुका कृषी विभागाने शेतकर्यांना 50 क्विंटल ज्वारीचे मोफत बियाणे वाटप केले. गहू पेरणी तालुक्यात 9 हजार हेक्टरवर होते. यावर्षी जवळपास 5 हजार हेक्टरवर झाली आहे. गव्हाची 60 टक्के पेरणी झाली आहे. हरभरा 8 हजार 136 हेक्टरवर नियोजन झाले आहे. 101 टक्के पेरणी झाली असून अजून ती 115 टक्क्यांपयर्ंत जाईल. यंदा 15 ते 20 टक्के पेरणी वाढणार आहे.
मकाचे क्षेत्रही यावर्षी वाढणार आहे. 2210 हेक्टरवर मकाचे नियोजन होते. त्यात वाढ होईल. आता 2681 हेक्टरवर पेरणी झाली. ती 4 हजार 123 हेक्टरपर्यंत जाईल. मका चारा पीक असल्याने 144 टक्क्यांपर्यंत पेरणी होईल. कांदा पिकाचे नियोजन 2600 हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. आता 27 टक्के लागवडी झाल्या आहेत. कांद्याच्या क्षेत्रात वाढ होऊन ते 3500 हेक्टर पर्यंत जाईल. चारा पिकांचे क्षेत्र 3521 हेक्टरपर्यंत जाईल.
रब्बीच्या सरासरी 22 हजार हेक्टरक्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्या 2700 हेक्टरपर्यंत जातील. 70 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, असेही तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले.